गोंदिया: गोंदिया–गोरेगाव मार्गावर बुधवारी मध्यरात्री हिरडामाली–मिलटोली दरम्यान दोन दुचाकींच्या भीषण अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीवर गोंदियातील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

या दुर्घटनेत पीयूष योगेश बारेवार (२८, रा. गोरेगाव), मनोज कुरंजेकर (२७) आणि विनय कोहरे (२८, दोघेही रा. सोनी, ता. गोरेगाव) यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पीयूष व त्याचे मित्र गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी बुधवारी गोंदियात आले होते. मिरवणूक आटोपून रात्री उशिरा ते गोरेगावच्या दिशेने परतत असताना हिरडामाली–मिलटोली परिसरात हा अपघात झाला. रात्री साडेअकरा ते मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेची तीव्रता एवढी होती की दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

धडकेचा आवाज आणि अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य सुरू करत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गोंदिया ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले, तर जखमीला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

अपघाताचे नेमके कारण काय?

या अपघातामागे अतिवेग, वाहनावरील नियंत्रण सुटणे किंवा अन्य कोणता घटक कारणीभूत ठरला, याचा तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत. रात्रीच्या वेळी वाढणारी वाहतूक, वेगावरील नियंत्रण आणि सुरक्षित प्रवासाच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, तिन्ही मृत युवक एकमेकांच्या परिचयाचे असल्याने गोरेगाव व सोनी परिसरावर शोककळा पसरली असून, या दुर्दैवी घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.