गोंदिया : पावसाच्या सरींनी डोंगररांगांना हिरवाईची शाल पांघरली आणि सतत वाहणाऱ्या जलप्रपाताने हाजराफॉलचे रूप अधिकच खुलले. त्यामुळे सालेकसा तालुक्यातील हाजराफॉलकडे पर्यटकांची पावले मोठ्या संख्येने वळू लागली आहेत. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधून पर्यटक येथे दाखल होत असून, पावसाळ्यात हे निसर्गस्थळ तीन राज्यांतील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

पावसाळ्यात हाजराफॉल परिसराचे निसर्गरूप अक्षरशः पालटते. डोंगरकड्यांवरून वेगाने कोसळणारे पाणी, त्याचा सतत कानावर पडणारा निनाद, दाट हिरवाई आणि धुक्याची हलकी चादर यामुळे परिसराला मनोहारी रूप प्राप्त होते. त्यामुळे शनिवार-रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी विशेषतः वाढताना दिसते. कुटुंबीय, मित्रमंडळी आणि निसर्गप्रेमींकडून या ठिकाणाला पसंती मिळत आहे.

तीन राज्यांच्या पर्यटकांना भुरळ

गोंदिया जिल्ह्याची भौगोलिक स्थिती मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या सीमावर्ती भागाशी जोडलेली असल्याने हाजराफॉलला या दोन्ही शेजारील राज्यांतील पर्यटकांसाठीही सहज पोहोचता येते. कमी अंतरात निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येत असल्याने या ठिकाणाची लोकप्रियता वाढत आहे. समाज माध्यम वरूनही परिसरातील निसर्गदृश्यांची माहिती मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याने नव्या पर्यटकांचे आकर्षण वाढण्याची शक्यता आहे.

पर्यटन विकासाला संधी

पर्यटकांची वाढती संख्या सालेकसा परिसराच्या अर्थकारणालाही चालना देऊ शकते. स्थानिक पातळीवर खाद्यपदार्थ विक्री, छोट्या व्यावसायिकांना रोजगार, वाहतूक तसेच अन्य पूरक व्यवसायांना संधी निर्माण होऊ शकते. मात्र, त्यासाठी पर्यटनस्थळाचा नियोजनबद्ध विकास आवश्यक आहे.

सुविधांसोबत सुरक्षिततेवर भर हवा

हाजराफॉलचा पर्यटन विकास करताना निसर्गाचा समतोल राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, सुरक्षित कठडे, वाहनतळ, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, दिशादर्शक फलक आणि आपत्कालीन मदत यांसारख्या मूलभूत सुविधा सक्षम करण्याची गरज आहे. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना आवश्यक आहेत. निसर्गाने मुक्तहस्ते उधळलेल्या सौंदर्यामुळे हाजराफॉलला पर्यटनाची मोठी क्षमता लाभली आहे. योग्य प्रसिद्धी, सुविधा आणि नियोजनाची जोड मिळाल्यास हे स्थळ विदर्भातील महत्त्वाचे निसर्गपर्यटन केंद्र म्हणून निश्चितच नावारूपाला येऊ शकते.