गोंदिया : गोंदिया ते जबलपूर दरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाच्या कामाला रेल्वे मंत्रालयाने हिरवी झेंडी दिली आहे. २५ मे रोजी रेल्वे मंत्रालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यात सुमारे ४७७ कोटी रुपये खर्च करून रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे धावणाऱ्या प्रवासी गाड्यांनाच याचा फायदा होणार नाही, तर रेल्वे विभागाच्या महसुलातही भर पडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बालाघाटचे खासदार डॉ. ढालसिंग बिसेन यासाठी बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होते. सध्या दुहेरी मार्ग नसल्यामुळे मालवाहू आणि प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीत मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. विशेषत: पॅसेंजर गाड्या उशिराने धावत असल्याने रेल्वे सुविधांबाबत गोंदिया, बालाघाट, सिवनी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दुहेरीकरण मार्ग आणि गोंदिया रेल्वे ओव्हरब्रिजच्या बांधकामामुळे सध्या धावणाऱ्या गाड्यांची समस्या तर दूर होईलच, शिवाय उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा रेल्वे प्रवासही सुकर होईल, असा विश्वास खासदार डॉ. बिसेन यांनी व्यक्त केला आहे. या दोन्ही कारणांमुळे गोंदिया-बालाघाट जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना ज्या सुविधा मिळाव्यात, त्या आपण सध्या देऊ शकत नसून, दुहेरीकरण मार्गाच्या निर्मितीमुळे हा प्रश्नही बहुतांशी सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – “महाविकास आघाडी सरकारच्‍या काळातील ३३ महिने…”, चंद्रकांत पाटील यांची टीका; म्हणाले…

यानंतर नागपूर ते रायपूरदरम्यानच्या थेट रेल्वेचा लाभ या दोन्ही जिल्ह्यातील प्रवाशांना मिळेल आणि उत्तर-दक्षिणदरम्यान धावणाऱ्या या कमी अंतराच्या रेल्वेचा लाभही मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना ब्रॉडगेज होऊनही हव्या त्या सुविधा मिळत नाहीये, अनेकदा रेल्वे प्रवाशांना गाड्या उशिराने धावत असल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुहेरीकरणामुळे गोंदिया, बालाघाट या दोन्ही जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी दूर होतील. डोंगर, दऱ्यातील, दुर्गम भागातील रेल्वे प्रवासाचा मार्गही सुकर होणार आहे.
…………………………

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gondia jabalpur broad gauge route to be doubled 477 crore expenditure ministry of railways orders survey sar 75 ssb
First published on: 03-06-2023 at 14:05 IST