गोंदिया: मागील काही दिवसांपासून गोंदिया-भंडारा जिल्ह्यात डॉक्टर नितेश बाजपाई आणि इतर लोकांचे बाळविक्रीचे प्रकरण गाजत असतानाच आता गोंदिया जिल्ह्यात बाळ चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा पसरली. या अफवेतून एका मनोरुग्ण महिलेला गावकऱ्यांनी रोखून धरत गोंधळ घातल्याची घटना गोंदियाच्या कटंगी येथे रात्रीच्या सुमारास घडली.

दरम्यान, रामनगर पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून सदर महिलेची नागरिकांच्या तावडीतून सुटका केली असल्यामुळे त्या महिलेचा जीव वाचविण्यात आला. या घटनेचे चित्रफिती आता समाज माध्यमांवर प्रसारित झाले असून, अशा प्रकारची कोणतीही अफवा कुणीही पसरवू नये, अन्यथा कारवाई होणार असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शेजारील भंडारा जिल्ह्यात बाळविक्री प्रकरण उघडकीस आले असून, भंडारा पोलिसांनी यातील मुख्य सुत्रधार गोंदिया येथील एक डॉक्टर नितेश बाजपाईसह ६ जणांना अटक केली आहे. हे प्रकरण सुरू असताना गोंदियाच्या ग्रामीण भागात बाळ चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा पसरल्याचे दिसत आहे. या अफवेचे पडसाद  रात्रीच्या सुमारास शहराला लागून असलेल्या कटंगी गावात दिसून आले. गावात संशयीतरित्या फिरत असलेल्या एका महिलेला बाळ चोरी करणारी असल्याचे समजून गावकऱ्यांनी रोखून धरत एकच गोंधळ केला. ही माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली.

घटनेची माहिती ११२ क्रमांकावर देण्यात आली. यावर रामनगर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत्त त्वरित घटनास्थळ गाठून प्रकरण जाणून घेतले. यावेळी सदर महिला ही मनोरुग्ण असून तिला आपले नाव व पत्ता देखील सांगता येत नसल्याचे आणि सदर महिलेला तिचे कुटुंबीय शोधत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढून सदर महिलेला गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवले व तिच्या कुटुंबीयांची माहिती घेऊन त्यांच्या स्वाधिन केले. पोलिसांनी अगदी वेळीचसूचकता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ होता होता टळला. घटनेचा चित्रफिती आता समाज माध्यमावर प्रसारित झाली असून, नागरिकांनी अशा अफवांना बळी न पडता आधी पुर्णपणे सत्यता जाणून घ्यावी आणि त्यानंतरच या संदर्भात कायदा हातात न घेता पुढचे पाऊल म्हणजे पोलिसांनी याबाबतची माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सदर महिला ही मनोरुग्ण असून, तिला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. बाळ चोरी सारखे प्रकार घडत असल्यास ११२ वर माहिती देणे अपेक्षीत आहे. मात्र, विनाकारण असा अफवा पसरवू नये, अफवा पसरविणा-यांच्या विरोधात वरीष्ठांच्या आदेशनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.- -संजय नागरगोजे, पोलिस उपनिरीक्षक, रामनगर (गोंदिया)