गोंदिया: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम आता देशातील छोट्या शहरांपर्यंत पोहोचला आहे.
त्याची झळ गोंदिया जिल्ह्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाला बसू लागली आहे. शासनाच्या सूचनेनुसार व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट तसेच लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास काही दिवसांतच अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
१० मार्च रोजी शासनाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबविण्यात आला असून आपत्कालीन सेवांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार रुग्णालये व काही शैक्षणिक संस्थांना आवश्यकतेनुसार गॅस पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा मात्र सुरळीत ठेवण्यात आला आहे. मात्र वितरण व्यवस्थेत किरकोळ बदल करण्यात आले असून एका सिलेंडरनंतर पुढील सिलेंडर मिळण्यासाठी पूर्वी लागणारा २१ दिवसांचा कालावधी वाढवून आता २५ दिवस करण्यात आला आहे.
केवळ दोन ते चार दिवस पुरेल एवढाच साठा?
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यात विविध गॅस कंपन्यांचे एकूण २१ वितरक कार्यरत असून सुमारे ३ लाख ४ हजार ७८८ घरगुती ग्राहकांची नोंद आहे. जिल्ह्यात दररोज सरासरी ४ हजार ९५६ घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण केले जाते. त्याचवेळी दररोज साधारणतः ७२ व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा होत असतो. सध्या जिल्ह्यात ९ हजार ८७ घरगुती गॅस सिलेंडरचा साठा उपलब्ध आहे; मात्र व्यावसायिक सिलेंडरचा साठा केवळ १९५ इतकाच उरला आहे. त्यामुळे अनेक हॉटेल व्यवसायिकांकडे केवळ दोन ते चार दिवस पुरेल एवढाच गॅस शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे.
केंद्रे सुरू ठेवणे कठीण
या परिस्थितीचा परिणाम केवळ व्यावसायिक हॉटेल्सवरच नव्हे तर शासनाच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेवरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात सध्या ५१ शिवभोजन केंद्रे कार्यरत असून दररोज सुमारे ५ ते ६ हजार गरजू नागरिक या योजनेचा लाभ घेतात. मात्र गॅस सिलेंडरच्या संभाव्य तुटवड्यामुळे ही केंद्रे सुरू ठेवणे कठीण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शासनाकडे निवेदन देण्याची तयारी
शिवभोजन केंद्र संचालकांच्या मते, जर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबला तर केंद्रांमध्ये स्वयंपाक करणे अशक्य होईल. त्यामुळे शिवभोजन केंद्रांना आपत्कालीन सेवांच्या यादीत समाविष्ट करून त्यांना नियमित गॅस पुरवठा करण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी शिवभोजन केंद्र संचालक मंडळाकडून शासनाकडे निवेदन देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती शिवभोजन संचालक सौरभ रोकडे यांनी दिली.
शासनाच्या आदेशानुसारच कार्यवाही
जिल्हा पुरवठा अधिकारी सतीश अगडे यांनी सांगितले की, गॅस कंपन्यांकडून जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमित सुरू आहे आणि त्याचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या संदर्भात शासनाच्या आदेशानुसारच कार्यवाही केली जात आहे. शिवभोजन केंद्रांसाठी स्वतंत्रपणे कोणतेही विशेष प्रावधान सध्या शासनाकडून करण्यात आलेले नाही.
अनिश्चिततेचे वातावरण
या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायिक, शिवभोजन केंद्र संचालक आणि ग्राहक यांच्यात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून शासनाने लवकरच ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
