गोंदिया शहरालगतच्या ग्राम मुर्री येथील एका ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल भलतेच संतापले. संतापाच्या भरात त्यांनी ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश कंगाले यांच्या कानशिलात लगावली. सोमवारी (२९ ऑगस्ट) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास सूर्याटोला उपविभाग कार्यालयात ही घटना घडली. या घटनेनंतर गोंदिया तालुक्यांतील समस्त वीज अभियंत्यांनी रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविण्याची मागणी केली. यामुळे पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी –

मिळालेल्या माहितीनुसार, लगतच्या ग्राम मुर्री निवासी लारोकर यांच्यावर ११,००० रुपयांचे वीजबिल थकीत असून वीज अभियंता शुक्रवारी त्यांच्याकडे वसुलीसाठी गेले होते. यावर सोमवारी बिल भरतो, असे सांगत त्यांनी वेळ मागितली. मात्र, सोमवारी त्यांनी बिलाच्या रकमेतील ४००० रुपये भरतो व उर्वरित रक्कम नंतर भरणार, असे सांगितल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे संतापलेले आ. अग्रवाल महावितरणच्या सूर्याटोला येथील उपविभाग कार्यालयात धडकले. तेथे उपस्थित असलेल्या उपकार्यकारी अभियंत्यास त्यांच्या कार्यालयाबाहेर बोलावून त्यांनी चापटा मारल्या. याप्रकारामुळे संतापलेल्या वीज अभियंत्यांनी लगेच रामनगर पोलीस ठाणे गाठून आमदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच या घटनेला गांभीर्याने घेऊन अभियंत्यांनी असहकार आंदोलनही सुरू केले. गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार व त्यादरम्यान काही समस्या उद्भवल्यास त्यासाठी जबाबदार राहणार नाही, असा इशारा अभियंत्यांनी दिला. मात्र, याप्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यामुळे रामनगर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gondia mla vinod aggarwal beat up mahavitran engineers msr
First published on: 30-08-2022 at 12:08 IST