गोंदिया : एकीकडे नवतपाच्या झळांनी विदर्भ होरपळून निघत असताना, दुसरीकडे विद्यापीठाच्या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अक्षरशः अग्निपरीक्षा ठरत आहेत. रणरणत्या उन्हात आणि ४५ ते ४६ अंश सेल्सियस तापमानात परीक्षा केंद्र गाठताना विद्यार्थ्यांची अक्षरशः लाही लाही होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत बी.एस्सी. उन्हाळी २०२६ च्या सहाव्या सत्राच्या परीक्षा २६ मे पासून सुरू झाल्या असून त्या २३ जूनपर्यंत चालणार आहेत. विशेष म्हणजे परीक्षेची वेळ दुपारी २.३० ते ५.३० अशी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुपारच्या कडाक्याच्या उन्हात परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागत आहे.

परीक्षा की उष्णतेची शिक्षा?

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी १० ते १२ किलोमीटर सायकल चालवत किंवा सार्वजनिक वाहतुकीने परीक्षा केंद्रावर जातात. भर दुपारी डांबरी रस्त्यांवरून प्रवास करताना उष्णतेच्या झळा सहन करणे कठीण होत असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. “परीक्षा देण्यापूर्वीच शरीरातील शक्ती संपते,” अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

अनेक परीक्षा केंद्रांवर वातानुकूलित सुविधा नसल्याने वर्गखोल्यांमध्ये प्रचंड उकाडा जाणवत आहे. घामाच्या धारांत प्रश्नपत्रिका सोडवताना विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. उष्माघात, चक्कर येणे किंवा प्रकृती बिघडण्याचा धोका वाढल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.

विद्यापीठाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह!

विद्यार्थ्यांच्या आरोग्यापेक्षा वेळापत्रकाला अधिक प्राधान्य दिले जात असल्याची टीका आता केली जात आहे. “विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या परीक्षा जर त्यांच्या आरोग्यावरच घाला घालत असतील, तर हे नियोजन कितपत योग्य?” असा सवाल पालक उपस्थित करीत आहेत.

दरम्यान, सकाळच्या सत्रात परीक्षा घेणे किंवा उष्णतेची तीव्रता कमी होईपर्यंत परीक्षा पुढे ढकलणे, हा पर्याय विद्यापीठाने गांभीर्याने विचारात घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. नवतपाच्या दाहक झळांत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची ही व्यथा आता विद्यापीठ प्रशासनापर्यंत पोहोचणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.