गोंदिया: अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध धरण जलाशयात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळून येत आहेत. जलाशयाच्या काठावर हजारो मृत मासे तरंगताना दिसत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या जलाशयातून परिसरातील सुमारे ५० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे जलाशयातील पाणी दूषित झाल्यास हजारो नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नवेगावबांध जलाशय हा सुमारे ३,००० एकर क्षेत्रफळाचा असून परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत मानला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत जलाशयाच्या बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमित भागात बेकायदेशीरपणे भात शेती केली जात असल्याचे समोर आले आहे. या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा वापर केला जात असल्याने पावसाचे पाणी किंवा शेतीतून वाहून जाणारे रासायनिक द्रव्य थेट जलाशयात मिसळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे जलाशयातील पाणी प्रदूषित होत असून त्याचा परिणाम जलचरांवर दिसून येत आहे.

पिण्याच्या पाण्याबाबत नागरिकांमध्ये भीती

नवेगावबांध जलाशयातून नळयोजनेद्वारे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जवळपास ५० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. हेच पाणी गावातील घराघरांत पोहोचत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर या दूषित पाण्यामुळे कोणत्याही गावात विषबाधा किंवा साथीचा रोग पसरला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

स्थलांतरित पक्ष्यांनाही धोका

नवेगावबांध धरण परिसर हा स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात देश-विदेशातून विविध प्रजातींचे पक्षी येथे येतात. हे पक्षी जलाशयातील पाणी पितात आणि त्यावरच आपले जीवन अवलंबून ठेवतात. मात्र जलाशयातील पाणी प्रदूषित होत असल्याने या पक्ष्यांच्या जीवावरही संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वेळेत योग्य उपाययोजना न झाल्यास भविष्यात पक्ष्यांच्या मृत्यूच्या घटनाही घडू शकतात, अशी भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

अतिक्रमणामुळे वाढते प्रदूषण

जलाशयाच्या बुडीत क्षेत्रात वाढत असलेल्या अतिक्रमणामुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. भात (धानपिक) शेतीसाठी वापरली जाणारी रासायनिक खते व कीटकनाशके पावसाच्या पाण्यासोबत जलाशयात मिसळतात. परिणामी पाण्याची गुणवत्ता खालावत असून जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. नागरिकांनी याबाबत जलसंपदा विभाग आणि वन्यजीव विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

कारवाई होणार?

या प्रकरणी जलाशय प्रशासनाचे मुख्य अभियंता राजेंद्र कुरेकर, शाखा अधिकारी समीर बनसोडे तसेच वन्यजीव विभागाचे उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शुक्रवारी तलावात मत्स्यबीज टाकण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे मत्स्यबीजाचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. या संदर्भात सविस्तर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी

दरम्यान, जलाशयातील मासे मृत अवस्थेत आढळल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. जलाशयातील अतिक्रमण तात्काळ हटवून पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करावी, तसेच परिसरातील गावांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा भविष्यात पर्यावरणासह मानवी आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.