गोंदिया: अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरोली - महागावजवळ दुचाकी आणि स्कूल बसमध्ये समोरासमोर भीषण अपघात झाल्याची गंभीर घटना आज गुरुवार १८ जुलै रोजी सकाळी ११.१५ दरम्यान घडली. या अपघातात अर्जुनी मोरगाव येथे वीज वितरण विभागात कार्यरत कर्मचारी हरी कोहरे (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असणारी त्यांची पत्नी हिराबाई कोहरे वय ४० यासुद्धा गंभीररित्या जखमी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. महागाव येथील रहिवासी असलेले हरी कोहरे विद्युत वितरण पारेषण १३२ अर्जुनी मोरगाव येथे शासकीय सेवेत कार्यरत होते. ते आपले रात्रपाळीतील सेवा पूर्ण करून राहते गाव महागाव हे मुख्यालयापासून जवळ असल्याने शेतात खरीप हंगामातील भात लागवडीकरीता मशागतीच्या कामाला मदत करण्यासाठी आपल्या पत्नीसह अर्जुनी मोरगाववरून महागावकडे जात असताना राधिका पेट्रोल पंप सिरोली/महागावच्या जवळ स्कूल बस क्रमांक एम.एच. ३५ ए.जे. ३६३४ व त्यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने गंभीर अपघात घडला आणि या बसच्या धडकेत दुचाकी चालक हरी कोहरे यांना डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नीही गंभीररित्या जखमी झाल्याची चर्चा प्रत्यकक्षदर्शी उपस्थित जमावामध्ये होती. या घटनेचा तपास अर्जुनी मोरगाव पोलीस करत आहे. मृतकाच्या पत्नीवर ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे प्राथमिक उपचार करून त्यांचीही प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरीतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हेही वाचा - चंद्रपूर: धक्कादायक! डॉक्टर मुलीने वैनगंगा नदीत उडी घेतली, आत्महत्या करण्यापूर्वी काढले व्हिडीओ हेही वाचा - गोंदिया : सिंगलटोली संकुलात एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू भरधाव वेगात जात असताना मोटारसायकल घसरून एक तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना नागपूर येथील रुग्णालयात त्याचा आज गुरुवार १८ जुलै रोजी मृत्यू झाला. गोंदिया तालुक्यातील लोहारा येथील डिगंबर जयसिंग कटरे (३६) हा तरुण दुचाकीने भरधाव वेगात जात असताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटारसायकल घसरून तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला उपचाराकरीता प्रथम गोंदियातील केटीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढील उपचाराकरीता नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालावरून गोंदिया शहर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. तपास शहर ठाण्याचे पोलीस हवालदार हुकरे करत आहेत.