गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात बैलपोळा सणाच्या उत्साहात असतानाच देवरी तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांनी परिसरातील वातावरणावर शोककळा पसरली. देवरी शहरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात २४ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. दुसरीकडे, शेंडेपार येथील जंगलशिवारात ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला. दोन्ही घटनांमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास देवरी तहसील कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. ज्योती रुपेश दरों (वय २४) यांचा मृत्यू झाला असून रुपेश कन्हैयालाल दर्गे (वय २९) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही दर्रीटोला/भरेगाव परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.

देवरी शहरात भरणाऱ्या बैलपोळा सण पाहण्यासाठी रुपेश हे पत्नी ज्योती यांच्यासह दुचाकीने बाहेर पडले होते. सायंकाळी बैलपोळा संपल्यानंतर त्यांच्या दुचाकी वाहनात पेट्रोल भरण्यासाठी जात असताना समोरून आलेल्या सीजी ०७ बीए ३०६७ क्रमांकाच्या ट्रकची त्यांच्या दुचाकीला धडक झाली. अपघातानंतर ज्योती यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर रुपेश यांना १०८ रुग्णवाहिकेतून देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. देवरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी ७ वाजता सुमारास देवरी तालुक्यातील शेडेपार गावालगतच्या जंगलशिवारात ताराचंद मुंशी बावनकुळे (वय ६५) यांचा मृतदेह आढळून आला. ते गुरुवारी दुपार पासून घरून बेपत्ता होते. ग्रामस्थांकडून शोध सुरू असतानाच सकाळी जंगलशिवारात त्यांचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच देवरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी देवरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

ताराचंद बावनकुळे यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या मानसिक स्थितीबाबत प्राथमिक माहिती समोर आली असली, तरी त्यावरून निष्कर्ष काढणे शक्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातूनच या घटनेमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. पोळ्याच्या उत्साहात घडलेल्या या दोन घटनांनी देवरी तालुक्यातील सणाचा आनंद क्षणात विरून गेला.