गोंदिया : वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी मित्रांसोबत केक कापल्यानंतर काही तासांतच एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. दारू पिण्यावरून झालेल्या वादात तरुणाने एका व्यक्तीची कॉलर पकडून धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून त्याच्या मुलाने पाठलाग करीत डोक्यात फरशीचा तुकडा मारल्याने तरुणाचा मृत्यू झाला. मिथुन भैय्यालाल ठाकरे (३२, रा. नवाटोला) असे मृताचे नाव आहे. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास अंगूरबगीचा ते कटंगी कला मार्गावरील मोहबे हॉस्पिटल जवळील एकदंत कॉलनी परिसरात ही घटना घडली.

रामनगर पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथुन ठाकरे हा प्रतीक मुन्ना मेश्राम, शहबाज बंदे शब्बीर खान पठाण आणि राहुल राजेश पारधी यांच्यासोबत रोहित उर्फ लल्ला विलास बसेना याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अवंती चौकात गेला होता. केक कापल्यानंतर सर्वजण एकदंत कॉलनी परिसरात आले. त्यानंतर मिथुन आणि रोहित हे देवदास मेश्राम यांच्या घरी दारू पिण्यासाठी गेले.

रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दारू पिण्यावरून मिथुन आणि देवदास यांच्यात वाद झाला. या वादात मिथुनने देवदास यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली तसेच शिवीगाळ केली. हा प्रकार पाहून देवदास यांचा मुलगा संदीप मेश्राम (४२, रा. कटंगीटोला) तेथे आला आणि त्याने मिथुनला तेथून हाकलून लावले.

मात्र, रस्त्याने जात असताना मिथुन शिवीगाळ करीत असल्याने आणि संदीप ला ही धमकावत असल्याने वातावरण पुन्हा तापले. वडिलांसोबत झालेल्या धक्काबुक्कीचा राग मनात धरून संदीप त्याच्या मागे धावत गेला. रस्त्याच्या कडेला पडलेला फरशीचा तुकडा उचलून त्याने मिथुनच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. गंभीर दुखापत झाल्याने मिथुन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

मिथुनचा भाऊ निलेश्वर ठाकरे हा युनायटेड हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असताना रात्री सव्वाच्या सुमारास राहुल नेवारे याचा फोन आला. ‘मिथुनला मारले आहे,’ अशी माहिती मिळताच निलेश्वर घटनास्थळी धावला. मात्र, काही वेळापूर्वीपर्यंत मित्रांसोबत वाढदिवस साजरा करणारा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात निश्चल पडल्याचे पाहून त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

या प्रकरणी निलेश्वर ठाकरे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास रामनगर पोलिस निरीक्षक तिरुपती राणे करीत आहेत.