गोंदिया :- अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या तस्करांनी महसूल पथकातील एका अधिकाऱ्याला धमकी दिली. या प्रकरणी अधिकाऱ्याच्या तक्रारी वरून तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला .

तिरोडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर चालक व मालक राजू मोरे (४५ वर्षे), संतोष मोरे (२८ वर्षे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तिरोडा महसूल विभाग अंतर्गत अनेक ठिकाणी अवैधरीत्या वाळूची वाहतूक होत आहे. याला आळा घालण्यासाठी तिरोडाचे तहसीलदार यांनी पथकाची निर्मिती केली आहे. या पथकातील महसूल अधिकारी देवेंद्र नेवारे १७ मे रोजी सायंकाळी आपल्या सहकाऱ्यांसह तिरोडा जवळील कवलेवाडा परिसरात गस्तीवर होते. गस्ती दरम्यान त्यांना एक निळ्या रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५ एडब्ल्यू २१५३ हा कवलेवाडा पावर हाउस कडून येताना दिसला. पथकाने ट्रॅक्टर थांबवून वाळू वाहतुकीच्या परवाना बाबत विचारपूस केली. मात्र, ट्रॅक्टर चालकाने आपल्याकडे वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याचे सांगितले. त्यानंतर महसूल पथकाने ट्रॅक्टर तिरोडा तहसील कार्यालयात घेऊन चला, असे म्हटले असता ट्रॅक्टर चालकाने महसूल अधिकारी देवेंद्र नेवारे यांना शिवीगाळ करून अडवणूक केल्यास मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी देवेंद्र नेवारे यांनी तिरोडा पोलिसांना सूचना दिली. लगेच तिरोडा पोलीस ठाण्यातील शिपाई कैलास ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन वाळू भरलेला ट्रॅक्टर तिरोडा पोलीस ठाण्यात जमा केला. तसेच आरोपी राजू मोरे व संतोष मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस शिपाई ज्ञानोबा श्रीरामे हे करीत आहेत.

अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू

तिरोडा तालुक्यात तुमसर-तिरोडा मार्गावर विहिरगाव-बिरसी दरम्यान १७ मे रोजी सायंकाळी ७:३० वाजेदरम्यान झालेल्या ट्रक-दुचाकी अपघातात दुचाकी चालकाचा उपचारा दरम्यान गोंदिया येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुमसर-तिरोडा मार्गावरील विहिरगाव-बिरसी दरम्यान तिरोड्याकडून तुमसरकडे डाक पार्सल घेऊन जाणारा ट्रक क्रमांक : एमएच ४० बीजी ५३५६ व तुमसर कडून तिरोड्याकडे येणारी दुचाकी क्रमांक : एमएच ३५ एझेड ५९३५ मध्ये झालेल्या अपघातात दुचाकी स्वार पुष्पराज रिजनलाल साकुरे (५०) रा. परसवाडा ता. तिरोडा हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारा करिता तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता प्रकृती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे पुढील उपचारासाठी पाठविले. केटीएस रुग्णालयात उपचार सुरू असताना पुष्पराजचा मृत्यू झाला. गोंदिया पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून तपास हवालदार विजय तिरपुडे करीत आहेत.