नागपूर : महाराष्ट्रातून जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर अलेल्या सारस पक्ष्यांच्या संवर्धनाला गोंदियातील ‘सेवा’ ( Sustaining Environment and Wildlife Assemblage) संस्थेच्या दोन दशकांच्या प्रयत्नांमुळे नवी आशा मिळाली आहे. २००४-०५मध्ये अवघ्या चार सारस पक्ष्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आता ३५ पर्यंत पोहोचला आहे. मात्र, ही संख्या टिकवून वाढविण्यासाठी सुरू असलेल्या संवर्धन कार्याच्या भरारीला अर्थबळाची गरज आहे.
गेल्या दोन दशकांपासून शेतकरी, ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांना बरोबर घेऊन ‘सेवा’ संस्थेने सारस संवर्धनाची मोहीम राबवली आहे. कार्यकर्त्यांनी अनेकदा स्वखर्चातून हे काम पुढे नेले. मात्र निधीअभावी संवर्धनाच्या कामात अडथळे येत आहेत. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातून ‘सेवा’च्या कार्याला हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सारसांचा अधिवास शोधणे, त्यांच्या जोड्या व घरट्यांची नोंद करणे आणि त्यांना असलेले धोके ओळखणे, या कामातून संस्थेच्या संवर्धन मोहिमेला सुरुवात झाली. सारस भातशेतात घरटी करीत असल्याने शेतकर्यांचे नुकसान होते. त्यामुळे संस्थेने ‘सारस मित्र’ तयार करून घरट्यांचे संरक्षण करण्याबरोबरच शेतकर्यांना शासनाकडून मिळणारा मोबदला मिळवून देण्याचे काम सुरू केले. सध्या संरक्षित सारसाच्या घरट्यामागे शेतकर्याला ३५ हजार रुपयांचा मोबदला मिळतो.
‘सारस फ्रेंडली राईस’ या उपक्रमातून सुमारे ८० एकर क्षेत्रात सेंद्रिय धानशेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. गोंदियासह भंडारा आणि मध्य प्रदेशातील बालाघाट येथेही संस्थेचे संवर्धन कार्य सुरू आहे. वीजवाहक तारांमुळे होणारे मृत्यू, कीटकनाशकांचा वापर, मोकाट कुत्र्यांचा धोका आणि अधिवासाचा र्हास, ही सारस पक्ष्यांसमोरील प्रमुख आव्हाने आहेत. या धोक्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी ‘सेवा’ संस्था शेतकरी, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांच्या साथीने काम करत आहे. विद्यार्थ्यांमध्येही सारस संवर्धनाबाबत जागृती निर्माण करण्याचे काम संस्थेकडून केले जाते.
संस्थेच्या संवर्धन कार्यासंदर्भातील अहवालाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही दखल घेतली आहे. मात्र, निधीअभावी अनेकदा संवर्धनाचे काम थांबण्याची वेळ येते. संवर्धनाची ही चळवळ अखंड सुरू राहणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाबरोबरच समाजातील विविध घटकांनीही पुढे येऊन मदतीचा हात देण्याची गरज आहे.
