गोंदिया: गोंदिया वनपरिक्षेत्रातील दासगाव बीट आणि मजीतपूर परिसरात रविवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. गंगाझरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीच्या धडकेत एका रानअस्वलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वन्यजीव संवर्धनासमोरील वाढते आव्हान आणि जंगलातून धावणाऱ्या रेल्वेमार्गांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सुरक्षित अधिवासाच्या शोधात वन्यजीवांचे स्थलांतर
वनविभाग कडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जंगलातून अधिवास बदलत असताना हे अस्वल रेल्वे रुळ ओलांडत होते. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या रेल्वेगाडीची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृत अस्वलाचा ताबा घेण्यात आला असून, नियमानुसार शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्काराची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती दिली. गोंदिया जिल्ह्यातील दाट वनक्षेत्रातून अनेक रेल्वेमार्ग जात असल्याने वन्यप्राण्यांच्या हालचाली आणि रेल्वे वाहतूक यांच्यातील संघर्ष अधूनमधून समोर येत असतो. विशेषतः पावसाळ्यात अन्न, पाणी आणि सुरक्षित अधिवासाच्या शोधात वन्यजीव मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतात. अशा काळात रेल्वेमार्ग ओलांडताना अपघातांची शक्यता वाढते.
रेल्वे-वन विभागात प्रभावी समन्वयाची गरज
पर्यावरणप्रेमींच्या मते, संवेदनशील वनक्षेत्रात रेल्वेगाड्यांच्या वेगावर नियंत्रण, वन्यजीवांच्या नियमित हालचालींचे वैज्ञानिक मॅपिंग, आधुनिक सेन्सर प्रणाली आणि रेल्वे-वन विभागातील समन्वय अधिक प्रभावी करणे ही काळाची गरज आहे. विकास आणि वन्यजीव संरक्षण यांचा समतोल राखला तरच अशा वेदनादायी घटनांना आळा बसू शकतो. गंगाझरीजवळील ही घटना केवळ एका वन्यजीवाच्या मृत्यूपुरती मर्यादित नसून, निसर्ग आणि मानवी विकास यांच्यातील समतोल अधिक संवेदनशीलपणे जपण्याची सामूहिक जबाबदारी ठरविणारी ठरली आहे.
