गोंदिया : पावसाच्या आगमनाने शेतशिवार हिरवाईने नटू लागले असले, तरी त्याचबरोबर विषारी साप, विंचू आणि विविध कीटकांची हालचालही वाढली आहे. परिणामी, जिल्ह्यात अवघ्या तीन दिवसांत सर्पदंश, विंचूदंश आणि अनोळखी कीटकदंशाच्या तब्बल १५ घटना घडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

४ ते ७ जुलै दरम्यान घडलेल्या या घटनांमध्ये सर्पदंशाच्या सहा, विंचूदंशाच्या चार आणि अनोळखी कीटकदंशाच्या पाच रुग्णांचा समावेश असून, सर्वांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत. पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी शिरल्याने साप आणि विंचू सुरक्षित आसऱ्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळतात. शेतातील कामे, झुडपांमधील वावर, रात्रीची हालचाल आणि घराच्या परिसरातील ओलसर वातावरण यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे आरोग्य क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी विशेष दक्षता बाळगण्याची गरज आहे.

सर्पदंश झालेल्यांमध्ये सडक-अर्जुनी तालुक्यातील खोबा येथील दुर्गेश विलास वैद्य (२८), तिरोडा तालुक्यातील बरबसपुरा येथील रितीक रूपसेन शेंद्रे (२१), सालेकसा तालुक्यातील केहरीटोला येथील दुर्गेश रामजी सोनवाने (२९), कारंजा येथील ताराचंद मानीकराम नागपुरे (३५), रामाटोला येथील सरस्वता शंकरलाल मडावी (४०) तसेच तिरखेडी येथील किशोर कुवरलाल परिहार (४२) यांचा समावेश आहे.

विंचूदंशाच्या घटनांमध्ये हाबुटोला (बिर्सी) येथील रवींद्र राधेश्याम उके (३५), रामनगर येथील अविनाश विठ्ठलराव बामणे (४९), खातिया येथील दुर्गेश राजू चौरे (३४) आणि दत्तोरा येथील उमेश केशोराव ब्राम्हणकर (३०) यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, अनोळखी कीटकदंश झालेल्यांमध्ये आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथील नरेशकुमार ओमप्रकाश हुकरे (३५), सितेपार येथील सरिता कृष्णकुमार बिसेन (३२), सालेकसा तालुक्यातील पिपरीया येथील दुनेश्वरी दिनेश अतकरे (३२), मध्य प्रदेशातील लांजी येथील कृष्णा अनंतराम बागडे (४०) तसेच गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील ज्योती दिगंबर लाडे (१९) यांचा समावेश आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सर्प किंवा विंचूदंश झाल्यास अंधश्रद्धेला बळी न पडता तातडीने वैद्यकीय उपचार घेणे अत्यावश्यक आहे. तसेच शेतात काम करताना गमबूट, हातमोजे वापरणे, रात्री टॉर्चचा वापर करणे आणि घराच्या परिसरातील झुडपे व कचरा हटविणे, या साध्या उपाययोजनांमुळे अशा घटनांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. पावसाच्या सरींसोबत वाढणाऱ्या या अदृश्य संकटामुळे नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज निर्माण झाली आहे.