गोंदिया : शहरातील मुख्य रस्त्यांपासून ग्रामीण भागातील अरुंद गल्लीबोळांपर्यंत भटक्या श्वानांचा वाढता वावर आता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर आव्हान ठरत आहे. शाळेत जाणारी लहान मुले, सकाळ-संध्याकाळ फिरणारे ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वारांना श्वानांच्या टोळ्यांचा वाढता त्रास सहन करावा लागत असून, जिल्ह्यात यंदाच्या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत तब्बल २,१८० नागरिकांना श्वानदंश झाल्याची धक्कादायक नोंद जिल्हा आरोग्य विभागाच्या आकडेवारीत झाली आहे. म्हणजेच दरमहा सरासरी ३६४ नागरिक भटक्या श्वानांचे बळी ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
गेल्या काही वर्षांत ही समस्या अधिक तीव्र होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. २०२१ मध्ये ७०१, २०२२ मध्ये २,०५६, २०२३ मध्ये १,८२८, २०२४ मध्ये २,५२६ आणि २०२५ मध्ये तब्बल ३,०६२ श्वानदंशाच्या घटना नोंदल्या गेल्या. या पाच वर्षांत श्वानदंशामुळे पाच नागरिकांचा मृत्यू झाला असून, यंदा ३० जूनपर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाढत्या घटनांनी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोर नवे प्रश्न उभे केले आहेत.
उपाययोजनांचा अभाव
भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येमागे कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, निर्बीजीकरण मोहिमेची संथ गती, पुरेशा आश्रयव्यवस्थेचा अभाव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सातत्यपूर्ण नियंत्रण उपाययोजनांचा अभाव ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. अनेक ठिकाणी श्वानांचे कळप सार्वजनिक ठिकाणी मुक्तपणे फिरताना दिसत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ही समस्या केवळ त्रासदायक न राहता सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याच्या चिंतेचा विषय ठरू लागली आहे.
दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये श्वानदंश व सर्पदंशावरील लसी, इम्युनोग्लोब्युलिन आणि आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली.
आरोग्य केंद्रात उपचार घ्या
श्वान चावल्यानंतर जखम तातडीने वाहत्या पाण्याने व साबणाने स्वच्छ धुवून कोणत्याही प्रकारचे घरगुती उपचार अथवा अंधश्रद्धेचा आधार न घेता त्वरित आरोग्य केंद्रात उपचार घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी आवाहन केले.भटक्या श्वानांचा प्रश्न हा केवळ आरोग्य विभागाचा नाही; तो स्थानिक प्रशासन, स्वच्छता व्यवस्था, निर्बीजीकरण मोहीम आणि नागरिकांच्या जनजागृतीशी निगडित आहे. अन्यथा, आजचा हा वाढता विळखा उद्या सार्वजनिक सुरक्षेवरील अधिक मोठे संकट ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
