गोंदिया : जिल्ह्यातील नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात २०२४ यावर्षी एप्रिल महिन्यात एक वाघीण सोडण्यात आली होती. ही वाघीण या व्याघ्र प्रकल्पात स्थिरावली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी ती या प्रकल्पात भरकटली असून, तिचा सध्या वावर गोंदिया शहराजवळील ढाकणी परिसरात असल्याची माहिती आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगत वन व वन्यजीव विभागाने या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाप्रमाणेच इतर व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढावी व पर्यटनाला चालना मिळावी, या हेतूने गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध- नागझिरा व्याघ्र प्रकल्पात २० मे २०२३ रोजी दोन वाघिणी सोडल्या होत्या. मात्र, काहीच दिवसांत त्यापैकी एक वाघीण रस्ता भरकटल्याने वन विभागाचा हा प्रयत्न अयशस्वी झाला होता. ती वाघीण मध्य प्रदेशातील कान्हा-किसली व्याघ्र प्रकल्पात गेली. यानंतर १२ एप्रिल २०२४ रोजी पुन्हा एक वाघीण नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आली होती. ती वाघीण रस्ता भरकटल्याने सध्या गोंदिया शहरालगत असलेल्या ढाकणी परिसरात असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भरकटलेल्या वाघिणीला व्याघ्र प्रकल्पात परतावून लावण्यासाठी वन व वन्यजीव विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या या वाघिणीचा वावर गोंदिया शहरालगत असलेल्या ढाकणी परिसरात असल्याने या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे गोंदियाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांनी कळविले आहे.

हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांची चिंता वाढणार, सर्वच परीक्षा लांबणार?

हेही वाचा – मंत्री गिरीश महाजनांवर उच्च न्यायालयाची नाराजी, काय आहे प्रकरण?

आधीची परतेना आता दुसरीही…

नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढविण्यासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत २० मे २०२३ रोजी या व्याघ्र प्रकल्पात दोन वाघिणी सोडण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक वाघीण स्थिरावली तर एक वाघीण भरकटत मध्य प्रदेशातील जंगलात पोहोचली. ती अद्यापही या व्याघ्र प्रकल्पात परतलेली नाही. त्यानंतर यावर्षी १२ एप्रिलला सोडण्यात आलेली तिसरी वाघीणसुद्धा या व्याघ्र प्रकल्पातून भरकटली. त्यामुळे वन्यजीव व वन विभागाची सध्या झोप उडाली आहे. ही वाघीण सध्या शहरालगत असल्याने नागरिकांना कोणतेही नुकसान होईल, याबाबतची खबरदारी घेत या परिसरात वन विभागाने गस्त वाढविली आहे.