गोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्यातील झुरकुटोला परिसरात वाघाच्या हल्ल्यात ७२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (१५ सप्टेंबर) दुपारी उघडकीस आली. वातू बकाराम राऊत असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने झुरकुटोला परिसरासह लगतच्या गावांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, जंगलालगतच्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वातु राऊत हे सकाळच्या सुमारास घरातील शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी झुरकुटोला येथील पहाडीवरील जंगल परिसरात गेले होते. हा भाग एफडीसीएमच्या कंपार्टमेंट क्रमांक ५२४ मध्ये येतो. जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक राऊत यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

राऊत यांच्यासोबत असलेल्या इतर शेतकऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने गावात धाव घेतली. पाटेकुर्रा येथील सरपंच प्रशांत बालसनवार यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी तत्काळ वन विभाग व पोलिसांना कळविले. माहिती मिळताच वन विभागाचे पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वन कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी करून वाघाच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी सडक-अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे, डुग्गीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.

जंगलालगतच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

या घटनेमुळे एफडीसीएम जंगल परिसरात वाघाचा वावर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. शेतीची कामे, जनावरांसाठी चारा आणि सरपणासाठी जंगल परिसरात जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांनी एकट्याने जंगलात जाऊ नये, तसेच वन परिसरात विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.