गोंदिया : गोंदिया–तिरोडा मार्गावर गंगाझरी परिसरातील मजितपूर शासकीय आश्रमशाळेजवळ रविवारी सायंकाळी सुमारे ७:१५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मागून भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो वाहनाने पल्सर दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. या घटनेने धापेवाडा येथील लोधीटोला परिसरावर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये सौरभ जयसिंह बघेले, गौरव गणेश बैठवार आणि निखिल वासुदेव मेश्राम यांचा समावेश आहे. तिघेही धापेवाडा, लोधीटोला येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
गंगाझरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही पल्सर दुचाकीने तिरोड्याकडून गोंदियाच्या दिशेने प्रवास करीत होते. मजितपूर शासकीय आश्रमशाळेजवळ पोहोचताच मागून आलेल्या बोलेरो वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की तिघेही रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच गंगाझरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज राजुरकर पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा ताबा घेत वाहतूक सुरळीत केली. तिन्ही मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी गोंदिया जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, या अपघातामुळे गोंदिया–तिरोडा मार्गावरील भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे या घटनेने स्पष्ट केले आहे. अपघाताचा पुढील तपास गंगाझरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक धीरज राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
