गोंदिया: तरुणाई भ्रमणध्वनीमध्ये इतकी गुंग झाली आहे की, रस्त्यावर दुचाकी चालवतानाही भ्रमणध्वनी कानाला लावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.
वेग, वाहतूक नियम आणि स्वतः सह दुसऱ्यांचा जीव याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून मोबाइलवर बोलणे, व्हिडीओ कॉल करणे किंवा मेसेज पाहणे ही धोकादायक सवय अपघातांना आमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात जिल्हा वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेत दुचाकी चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.
चालू वर्षात दुचाकी चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्या ६७९ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्यावर ७ लाख ३५ हजारांचा दंड ठोठावला आहे.
दुचाकी चालवताना भ्रमणध्वनीवर बोलणे हे अत्यंत धोकादायक असल्याचे तज्ज्ञ वारंवार सांगतात. मोबाइलवर संभाषण करताना चालकाचे लक्ष रस्त्यावरून हटते. वाहनाचा वेग, आजूबाजूची वाहतूक, सिग्नल, पादचारी किंवा अचानक समोर येणारे अवजड वाहन यांचा अंदाज राहत नाही. अचानक ब्रेक लावण्याची वेळ आली किंवा परिस्थिती बदलली तर वेळेवर प्रतिक्रिया देता येत नाही. त्यामुळे किरकोळ अपघातांसह गंभीर जखमा, अपंगत्व आणि मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
असे अनेक दुचाकीचालक मोबाइलवर बोलताना दिसतात.शहरासह जिल्ह्यात वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांकडून मोहिमा राबविण्यात येत आहेत. यामध्ये जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यादरम्यान दुचाकी चालविताना मोबाईल वर बोलणारे ६७९ दुचाकी चालक मिळून आले.
या सर्व दुचाकी चालकावर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली त्यानुसार ७ लाख ३५ हजार रुपये दंड आकारण्यात आले आहे.
जनजागृतीची गरज…
दुचाकी चालवताना मोबाइलवर बोलणे रोखण्यासाठी केवळ पोलिस कारवाई पुरेशी नसून समाजानेही याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. पालकांनी त्यांच्या पाल्यांना वाहन चालवताना मोबाईल वापरू नये, याबाबत ठाम सूचना देणे, महाविद्यालये व सेवाभावी संस्थांनी वाहतूक सुरक्षिततेबाबत जनजागृती कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. तसेच मित्रमंडळी आणि प्रेमी युगुलांनीही सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. दुचाकी चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्यांमध्ये तरुण-तरुणी, विशेषतः प्रेमीयुगुलांची संख्या तुलनेने अधिक असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. कॉलेज, नोकरी किंवा फिरण्यासाठी निघालेले तरुण दुचाकी चालवत असतानाच दीर्घकाळ मोबाइलवर संवाद साधताना दिसतात. काहीजण तर दुचाकी चालवतानाच व्हिडीओ कॉल किंवा सोशल मीडियावर संभाषण करीत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
” दुचाकी चालवताना मोबाइलवर बोलणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. काही सेकंदांचे दुर्लक्षही जीवघेणे ठरू शकते. विशेषतः तरुणांनी याची गंभीर दखल घ्यावी. नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल. केवळ दंडच नाही, तर नियम मोडणाऱ्यांवर परवाना निलंबनासारखी कारवाईही या पुढे करण्यात येणार आहे.”-नागेश भाष्कर, पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, गोंदिया
