गोंदिया : देवरी तालुक्यातील शिलापूर-पुराडा मार्गावरील बाघनदीच्या पुरात ट्रॅक्टर वाहून गेल्याची घटना सोमवार, २२ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजतादरम्यान घडली. यामध्ये ट्रॅक्टर चालकाला आततायीपणा आणि अतिशहाणपणा चांगलाच नडला. कृष्णा मारोती वलथरे (३०, रा. पद्मपूर) असे ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. वलथरे यांना स्वत:चा जीव वाचवण्यात यश आले असले तरी ट्रॅक्टर मात्र बाघनदीत वाहून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, काही मजूर महिला या ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या कामासाठी गेल्या होत्या. पुलावरून पुराचे पाणी वाहत असतानाही चालकाने अतिआत्मविश्वास दाखवत पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला.शिरपूरच्या मनोहर सागर धरणाचे वक्र दरवाजे उघडण्यात आल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीला पूर आला आहे. चालकाने ट्रॅक्टर पुराच्या पाण्यात नेताच तो वाहून गेला. सुदैवाने चालक बचावला.देवरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांनी तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून घटनास्थळी पुलाची मागणी केली जात असून लोकप्रतिनिधी याकडे सर्रास दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हेही वाचा - प्रकल्प अवैध, तरी प्रशासनाची डोळेझाक! नागपूरच्या अंबाझरीतील गृहप्रकल्पावर पर्यावरणवाद्यांचा आक्षेप देवरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका अनेक गावांना बसल्यामुळे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांनी देवरी पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या गावातील पोलीस पाटलांशी संवाद साधत आढावा घेतला. यात त्या-त्या गावातील पूरपरिस्थिती, जीवित-वित्तहानी, किती भागात पाणी शिरले, घरांचे झालेले नुकसान, अंशत व पूर्ण पडझड झालेल्या घरांची संख्या, जनावरांचे झालेले नुकसान, स्थलांतरित केलेल्या नागरिकांची संख्या, याचा आढावा घेतला आहे. धानुटोलात विहिरीत पडून मजूर ठार गोंदिया जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. शेतात असलेली विना कठड्याची विहीर लक्षात न आल्यामुळे एका मजुराचा त्यात पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी गोरेगाव तालुक्यातील धानुटोला येथे उघडकीस आली. मृताचे नाव रेखलाल विठोबा गौतम (६३) असे आहे. गोंदिया : देवरी तालुक्यातील शिलापूर-पुराडा मार्गावरील बाघनदीच्या पुरात ट्रॅक्टर वाहून गेल्याची घटना सोमवार, २२ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजतादरम्यान घडली. यामध्ये ट्रॅक्टर चालकाला आततायीपणा आणि अतिशहाणपणा चांगलाच नडला. pic.twitter.com/y3Rs3DQtDY— LoksattaLive (@LoksattaLive) July 23, 2024 हेही वाचा - अकोला : पेरणी आटोपली, तरीही २९ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षाच; बँकांची उदासीनता… जिल्ह्यात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. आमगाव, देवरी, सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्याचबरोबर इतर तालुक्यांत देखील दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतशिवार जलमग्न झाला. बांध्यांमध्ये देखील पाणी साचले आहे. गोरेगाव तालुक्यातील शहारवानी येथील रेखलाल विठोबा गौतम हा व्यक्ती शेतात गेला होता. मात्र तो घरी परतला नाही. त्याची सर्वत्र शोधाशोध करण्यात आली नाही. मात्र त्याचा पत्ता लागला नाही. सोमवारी धानुटोला परिसरात पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. सेवानंद सेखलाल गौतम (३१) यांच्या तक्रारीवरून गंगाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तपास पोलीस हवालदार शामकुमार देशपांडे करत आहेत.