गोंदिया : भाज्यांची खरी मजा तर हिवाळ्यातच असल्याचे बोलले जात असून ते खरेही आहे. कारण हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असून त्यांचे दर ही प्रत्येक जणांच्या खिश्याला परवडणारे असतात.मात्र आता उन्हाळ्याची काहीशी चाहूल लागताच भाजीपाला अचानक भडकला असून खरेदी करताना आता सर्वसामान्यांची अडचण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या किमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे.

वाढत्या तापमानामुळे उत्पादनात घट, पाण्याची टंचाई आणि वाहतूक खर्च वाढल्याने बाजारात दर वाढले आहेत. मागील डिसेंबर, जानेवारी महिन्यात २०-३० रूपये किलोवर आलेला भाजीपाल्याचे दर आता १००-१२० रूपयांच्या घरात पोहचला आहे. हिरव्या भाज्यांचे दरही आता चढले असून उन्हाळ्याचा चटका त्यांना जाणवताना दिसत आहे. मागील महिन्यापर्यंत भाजीपाल्याचे दर घसरल्याने भाजी खरेदी करताना विविध भाज्या खरेदी केल्या जात होत्या.

मात्र आता उकाडा वाढून उन्हाळ्याने आपली चाहूल दाखवताच भाजीपाला भडकला आहे. गोंदिया जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या मते, उष्णतेमुळे भाजीपाल्याचे नुकसान वाढते तसेच साठवणुकीचा खर्चही वाढतो. ग्रामीण भागात पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटत असल्याने पुरवठा कमी पडत आहे.दरम्यान, भाजी उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की वाढलेल्या खतांच्या आणि मजुरीच्या खर्चामुळे त्यांनाही उत्पादन खर्च भागवणे कठीण झाले आहे. एकंदरीत उन्हाळा संपेपर्यंत भाजीपाल्याचे दर असेच चढे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

साक्षगंध, लग्नसराईसह ‘रमजान’मुळे ‘तेजी’

सध्या सर्वत्रसाक्षगंध, लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे मिरची, लिंबू, गाजरसह अन्य भाजीपाल्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तशातच मुस्लिम बांधवांचा ‘रमजान’ महिन्यामुळे उपवास (रोजा) सुरू आहे. त्यामुळेही विविध खाद्यपदार्थांची दुकानेही थाटली गेली आहेत. त्यामुळे मिरची, लिंबूची मागणीही वाढली आहे. त्यामुळेही मिरचीच्या दरात तेजी आली आहे.

‘लिंबू’चे दरही वधारले

मध्यंतरी ८० रुपये किलोने विक्री होणारा लिंबू आता वधारला आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर शीतपेय विक्रेत्यांनी सरबतची दुकाने थाटल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लिंबू खरेदी केला जात आहे. त्यामुळे लिंबूला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. यामुळे आता दर २०० किलो रूपयांवर पोहचले आहे. सध्या बाजारात शेवगा, दोडके १२० रूपये किलो दरावर पोहचले आहेत.

तर चवळीच्या शेंगा, भेंडी, मिरची, आलं १०० रूपये किलोवर आले आहेत. याशिवाय, अन्य भाज्या ६० ते ८० रूपये किलोच्या मधात आल्या आहेत.
भाज्यांमध्ये पालक, मेथी ही चढली आहे. मागील महिन्यांत १० रूपये किलो दराने मेथी व पालक विकल्या गेली. आता मात्र उन्हाळा सुरू होताच त्यांचे दर वधारले आहे. सध्या मेथी ५० रूपये, पालक ५० रूपये तर चवळी भाजीही ५० रूपये किलोवर पोहचली आहे.

टोमॅटो, वटाण्याच्या शेंगा मात्र जमिनीवरच

गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे टोमॅटो १० ते २० रुपये किलो दराने विक्री होत आहे. त्याच प्रमाणे शेजारील छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्यातील वटाण्याच्या शेंगा ची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने २० ते ३० रुपये प्रति किलो दर आहे.