गोंदिया : तिरोडा तालुक्यातील खरीप हंगामातील शेतीची कामे जोमात सुरू असतानाच तिरोडा तालुक्यातील उमरी आणि धादरी परिसरात रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवाने शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुरुवारी (१३ ऑगस्ट) रानडुकराने वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या हल्ल्यांत तीन शेतकरी गंभीर जखमी झाले. सलग घटनांमुळे शेतशिवारात भीतीचे सावट पसरले असून, वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारास उमरी येथील शेतात खरीप पिकाची कामे सुरू असताना कलाबाई महेश मोहारे (रा. सोनीली) यांच्यावर रानडुकराने अचानक हल्ला केला. त्यानंतर धादरी येथील शेतात काम करीत असलेले इसुदयाल रावजी पटले (रा. धादरी) यांच्यावरही रानडुकराने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. दरम्यान, दुपारी सुमारे ३ वाजता उमरी येथील उर्मिला कृष्णकुमार पाटील यांच्यावरही रानडुकराने हल्ला केला. या तिन्ही घटनांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रुग्णालयात उपचार सुरू
हल्ल्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तिन्ही जखमींना तातडीने शासकीय उपजिल्हा रुग्णालय, तिरोडा येथे दाखल केले. त्यांच्या शरीरावर खोल जखमा झाल्याने काही जखमांवर चार ते पाच टाके पडल्याची माहिती आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वन विभागासमोर आव्हान
गेल्या १५ दिवसांतील ही दुसरी घटना असल्याने शेतात जाणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत वाढली आहे. रानडुकरांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अजितकुमार ठवरे (प्रशासक) व ग्रामस्थांनी दिला आहे.खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी शेत हेच उपजीविकेचे केंद्र असताना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे त्यांनाच शेतात जाण्याची भीती वाटू लागल्याने वन विभागाच्या उपाययोजनांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
