गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुका सध्या रानटी हत्तींच्या धुमाकूळाने अक्षरशः हादरून गेला आहे. वडेगाव-बंध्या परिसरात हत्तीच्या कळपाने धुडगूस घालत शेकडो एकर मका शेती उध्वस्त केली. त्यानंतर या कळपाने आपला मोर्चा गोठणगाव, प्रतापगड, कालीमाती तसेच कवठा, डोंगरगाव आणि बोळदे या भागांकडे वळवला आहे. १४ एप्रिल रोजी रात्रीला कवठा-बोळदे शेतशिवारातील मका पिकांचे प्रचंड नुकसान केले होते. १५ एप्रिलला या कळपाचे दोन गट झाल्याचे दिसून आले. यापैकी एक गट एमटीडीसी नवेगावबांध परिसराकडे वळल्याचे सांगितले जाते, तर दुसरा १६ ते १७ हत्तींचा गट कवठा, डोंगरगाव आणि बोळदे परिसरातच थांबून पुन्हा विध्वंस करीत आहे.
गुरुवारी १६ एप्रिलच्या रात्री सुमारे अकराच्या सुमारास या हत्तींच्या कळपाने शेतकरी सीताराम कवळू मेंढे यांच्या शेतात शिरून मका पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. हिरव्या कणसांनी डोलणारे शेत काही क्षणांत उजाड वाळवंटासारखे भासू लागले. याच रात्री रामटेके यांच्या शेतातील सोलर पॅनलचीही तोडफोड केली. या घटनेमुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर आधुनिक शेतीसाठी उभारलेल्या सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे.
हत्तींच्या या सततच्या उपद्रवामुळे अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. शेकडो एकरांतील विविध पिके, सिंचन साधने आणि शेतीची पायाभूत संरचना उद्ध्वस्त होत असल्याने आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.
दरम्यान, वनविभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात असला, तरी प्रत्यक्ष उपाययोजनांचा अभाव जाणवत असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. आता तर “हत्तीमुक्त तालुका करा,” अशी मागणी केली जात आहे.
