गोंदिया: गोंदिया जिल्हा क्रीडा संकुल च्या मैदानावर काल शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी उत्साहात कबड्डीचा मैत्रीपूर्ण सामना पार पडला. या सामन्यात गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संघाने मुख्याधिकाऱ्यांच्या संघाला जोरदार टक्कर दिली. खेळाडूंनी उत्कृष्ट चढाया आणि बचाव करत प्रेक्षकांची मनं जिंकली. हा सामना जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या संघाने अखेर जिंकला.

जिल्हा परिषद गोंदिया पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कबड्डी सामन्याच्या सुरुवाती पासूनच दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संघात संघनायक म्हणून अध्यक्ष लायकराम भेंडारकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, उपाध्यक्ष सुरेश हर्षे आणि जिल्हा परिषद बांधकाम सभापती लक्ष्मण भगत, जिल्हा परिषद सदस्य किशोर महारवाडे, हनुमंत वटी, डॉ.भुनेश्वर पटले ,किरण पारधी, रितेश मलगाम विजय उके हे होते.

तर जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्या संघात संघनायक मुख्याधिकारी मुरुगनाथन एम., अतिरिक्त उपमुख्याधिकारी तानाजी लोखंडे, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य अधिकारी फरेंद्र कुतिरकर, पाणी व स्वच्छता विभाग प्रमुख विजय लोंढे, महिला व बाल विकास अधिकारी कीर्ती कटरे, मुख्य लेखा वित्त अधिकारी जनार्दन खोटरे आणि जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लिपिक आयुर राऊत, निलेश पाटील, स्वप्निल भोसले हे होते. या मैत्री पूर्ण कबड्डी च्या सामन्यात खेळाडूंनी दमदार ‘रेड’ मारत गुणांची आघाडी घेतली, तर मुख्याधिकाऱ्यांच्या संघाने शिस्तबद्ध बचाव करत सामना रंगतदार ठेवला.

प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात खेळाडूंना प्रोत्साहन दिले. क्रीडामैत्री आणि एकोप्याचा संदेश देणारा हा सामना शेवटपर्यंत थरारक ठरला. अखेरीस मुख्याधिकारी यांच्या संघाने थोडक्या फरकाने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संघावर विजय मिळवला. या उपक्रमामुळे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संवाद वाढण्यास मदत झाली असून क्रीडासंस्कृतीला चालना मिळाली आहे.