नागपूर : गोरेवाडा प्रकल्पातील वन्यप्राण्यांची देशातील विविध प्राणिसंग्रहालयांमध्ये देवाणघेवाण करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए), नवी दिल्लीने मंजुरी दिली आहे. त्यानुसार गोरेवाड्यातील वाघ आणि बिबट्यांची हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालँड आणि पुणे येथील प्राणिसंग्रहालयांमध्ये पाठवणी केली जाणार आहे. त्याबदल्यात नागालँड आणि हिमाचल प्रदेशातील काही वन्यप्राणी व पक्षी गोरेवाडा प्रकल्पात आणले जाणार आहेत.

आधी देवाणघेवाण प्रस्ताव

गोरेवड्यात सध्या क्षमतेपेक्षा अधिक वाघ आणि बिबट झाले आहेत. त्यांची संख्या वाढतच आहे. गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्राकडून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे प्राण्यांच्या देवाणघेवाणीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित प्राणिसंग्रहालयांशी पत्रव्यवहार करून हस्तांतरणाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

देवाणघेवाणीची प्रक्रिया नवी नाही

गोरेवाड्यातील वन्यप्राण्यांची इतर प्राणिसंग्रहालयांशी देवाणघेवाण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर गोरेवाड्यातून वाघ आणि इतर वन्यप्राणी देशातील विविध प्राणिसंग्रहालयांना पाठवण्यात आले आहेत. ऑक्टोबर २०२१ मध्ये गोरेवाड्यातील दोन वाघिणी आणि दोन अस्वल दिल्लीतील राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात पाठवण्यात आले होते. त्याबदल्यात गोरेवाड्याला काळवीट, सांबर आणि भेकर मिळाले होते. तसेच २०२४ मध्येही गोरेवाड्यातील अतिरिक्त वाघ-बिबट्यांच्या व्यवस्थापनासाठी विविध प्राणिसंग्रहालयांशी देवाणघेवाणीचे प्रस्ताव पुढे आले होते. जयपूरसह अन्य प्राणिसंग्रहालयांना वाघ देऊन त्याबदल्यात अन्य वन्यप्राणी गोरेवाड्यात आणण्याची प्रक्रिया त्यावेळी सुरू करण्यात आली होती.

मंजूर प्रस्ताव असा..

मंजूर प्रस्तावानुसार, हरियाणातील रोहतक प्राणिसंग्रहालयाला एक नर आणि दोन मादी वाघ तसेच एक नर व एक मादी बिबट्या देण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशातील रेणुकाजी मिनी झू, सिरमौर येथे एक नर व एक मादी वाघ पाठविण्यात येतील. नागालँडमधील नागालँड प्राणी उद्यान, दिमापूर आणि पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्राला प्रत्येकी एक नर व एक मादी वाघ देण्यास मंजुरी आहे. या देवाणघेवाणीच्या बदल्यात गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाला नागालँड प्राणी उद्यान, दिमापूर येथून एक नर व एक मादी हिमालयीन काळे अस्वल मिळणार आहे. तसेच रेणुकाजी मिनी झू, सिरमौर येथून दोन नर व दोन मादी रेड जंगल फाऊल आणण्यात येणार आहेत.

प्राण्यांच्या देवाणघेवाणीमुळे गोरेवाडा प्रकल्पातील प्राणिसंग्रहालयातील प्रजातींच्या व्यवस्थापनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मंजूर प्रस्तावानुसार संबंधित प्राणिसंग्रहालयांशी आवश्यक पत्रव्यवहार करून हस्तांतरणाची पुढील प्रक्रिया करण्यात येत आहे.