नागपूर : गोठणगाव गँग, गोठणगाव एक्प्रेस अशा एक ना अनेक नावांनी प्रसिद्ध झालेल्या ‘एफ टू’ वाघीण आणि तिच्या बछड्यांची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढतच आहे. सुरुवातीला तिने पाच बछड्यांना जन्म दिला तेव्हा आणि आता चार बछड्यांना जन्म दिल्यानंतर सुद्धा. त्यांना एकत्रित पाहणे हाच मोठा सोहळा आहे आणि असाच एक क्षण वन्यजीव छायाचित्रकार अमित खापरे यांनी टिपला आहे.
लहानपणापासूनच बिनधास्त
‘एफ टू’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या वाघिणीचने पहिल्यांदा जेव्हा पाच बछड्यांना जन्म दिला तेव्हा त्यांना पाहण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली, पण हा प्रकार पर्यटकांसह जिप्सीचालक आणि वाहकांच्याही अंगलट आला. अवघ्या काही महिन्याच्या या बछड्यांनी वनविभागाला थेट कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावल्या. त्यामुळे आता जेव्हा तिने चार बछड्यांना जन्म दिलाय तेव्हा त्यांच्या जवळ जाण्याची हिम्मत कुणीही करत नाही. दुरूनच त्यांचा कौतुक सोहोळा पाहिला जातो.
उमरेड-कऱ्हाडला अभयारण्याची ओळख
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला खरी ओळख मिळवून दिली ती ‘जय’ या वाघाने. नागझिरा अभयारण्यातून नैसर्गिक स्थलांतर करुन आलेला हा वाघ नंतर कधी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचा झाला ते कळलेच नाही. कधी राष्ट्रीय महामार्गावर, कधी नद्या ओलांडणाऱ्या ‘जय’ ला पाहण्यासाठी सामान्य पर्यटकांपासून तर ‘सेलिब्रिटी’ अशी सर्वांचीच गर्दी असायची. मात्र, ‘जय’ गेला आणि पर्यटकांनी या अभयारण्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर ‘फेअरी’ ही वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांनी पर्यटकांना आकर्षित केले. त्यानंतर पुन्हा पर्यटकांनी पाठ फिरवली. आता ‘एफ-२’ नावाची वाघीणसुद्धा आधी पाच आणि आता चार बछड्यांसह पर्यटकांना आकर्षित करत आहे. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वाराजवळ ‘एफ-२’ वाघीण आणि तिचे बछडे पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरले आहेत. उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वाराजवळ ते पर्यटकांना भुरळ घालत आहेत.
‘हे’ आहे वाघिणीचे कूळ
एफ-२ वाघीण ही फेअरी वाघिणीची मुलगी आहे. एन-४ आणि पाटील नावाच्या दोन वाघासोबत तिचा वावर होता. सध्या या परिसरात जे-मार्क नावच्या वाघाचा दबदबा आहे. नवंवर्षानिमित्त नागपूरच नाही तर विदर्भातील वनप्रेमी पर्यटकांची पावले नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडलाच्या जंगलाकडे वळली आहेत. या जंगलात वाघाचे हमखास दर्शन पर्यटकांना होत आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या देखील वाढीस लागली आहे. सध्या ही वाघीण आपल्या पाच बछड्यांसह गोठणगाव गेट परिसरात फिरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
