शासनाची घोषणा कागदावरच
विदर्भात सात ते आठ वर्षांपासून होत असलेला ‘स्वाईन फ्लू’चा प्रकोप लक्षात घेऊन नागपूरला या रुग्णांकरिता विलंबानेच का होईना अखेर स्वतंत्र वार्ड तयार झाला आहे. परंतु या वार्डाकरिता खाटा, कृत्रिम श्वसन यंत्रणेसह अद्यावत सामग्री उपलब्ध नसल्याने तो सुरू होणार कसा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाने गेल्यावर्षी नागपूरला तीन कोटींच्या उपकरणांची घोषणा केली. परंतु अद्याप एकही उपकरण आलेले नाही. शासनाकडून घोषणा खूप झाल्या, कृती कधी होणार? असा प्रश्न नागपूरकर विचारत आहेत.
नागपूरसह पूर्व विदर्भात सन २००८-२००९ पासून ‘स्वाईन फ्लू’चा प्रकोप सुरू आहे. या वर्षी मोठय़ा प्रमाणावर नागरिकांचे मृत्यू झाले. मेडिकल व मेयो या दोन्ही शासकीय रुग्णालयात शासनाकडून सोय करण्यात आली. सन २०१२ पर्यंत सतत रुग्ण आढळत असल्याने शासनाकडून मेडिकलमध्ये स्वाईन फ्लूग्रस्तांवर उपचाराकरिता स्वतंत्र ६ कोटी ५० लाखांच्या निधीतून तीन माळ्याच्या स्वाईन फ्लू वार्डाची घोषणा करण्यात आली. दोनच वर्षांत शासनाकडे निधी नसल्याचे सांगत हा वार्ड तीन माळ्यावरून एक माळ्यांचा करीत निधीत कपात करून तो १ कोटी ९१ लाखांवर आणला.
अखेर विलंबानेच का होईना हा वार्ड मार्चमध्ये मेडिकलला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हस्तांतरित केला गेला. परंतु अद्याप या वार्डात रुग्णांकरिता हवे असलेले फाऊलर बेड, व्हेंटीलेटर, एबीजी मशिनसह इतर आवश्यक व महागडे उपकरण व साधने शासनाकडून उपलब्ध करून दिल्या गेली नाही. तेव्हा हा वार्ड पांढरा हत्ती ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच सन २०१५ मध्ये नागपूरला १७५ च्या जवळपास मृत्यू स्वाईन फ्लूने झाले होते. राज्यात या रोगाच्या मृत्यूमध्ये नागपूरचा क्रमांक वरचा होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या समितीनेही शहरात निरीक्षण केले होते.
याप्रसंगी महापालिकेच्या एकाही रुग्णालयात स्वाईन फ्लूग्रस्ताला दाखल करून उपचाराची सोय नसल्याचे बघत त्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. तातडीने उपचार उपलब्ध करवून देण्याच्या सूचना दिल्या गेल्या. परंतु अद्याप महापालिकेच्या एकाही रुग्णालयात हे रुग्ण दाखल करण्याची व्यवस्था नाही. रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शहरात वेगवेगळ्या वेळी मेडिकलमध्ये स्वाईन फ्लू ग्रस्तांकरिता तीन कोटींच्या उपकरणांची घोषणा केली. परंतु अद्याप एकही उपकरण मेडिकलला पोहोचले नसल्याने आता घोषणा भरपूर झाल्या, कृती कधी? हा प्रश्न नागपूरकर विचारत आहेत. या उपकरणाकरिता जिल्हा नियोजन समितीकडून निधी दिल्या गेला होता. परंतु वैद्यकीय संचालकांकडून खरेदीला परवानगी न मिळाल्याने तो परत गेला, हे विशेष.

घोषित केलेले उपकरण
* १४ व्हेंटिलेटर
* १० पल्स ऑक्सिमीटर
* २० मल्टिपॅरा बेडसाईड मॉनिटर
* १ अन्ट्रासोनिक नेब्युलायझर
* १ पोर्टेबल एक्स-रे मशीन
* ३ रिससिटेशन किट
* १ गॅस अ‍ॅनालायझर (एबीजी मशीन)

मेडिकलमधील मृत्यू
वर्ष          मृत्यू
२०१३        ११
२०१४       ०४
२०१५       ९१