सरकारचे कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष

शेतकरी मोठय़ा प्रमाणात शेतमालाचे उत्पादन करतो. मात्र, त्याला त्याचे दर ठरविण्याचे अधिकार नाही.

अग्रोव्हिजन या कृषी प्रदर्शनात बांबूपासून तयार करण्यात आलेला शर्ट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना भेट देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शेजारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर. 

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची खंत

सरकारकडून कृषी क्षेत्राकडे अपेक्षेप्रमाणे लक्ष दिले जात नाही, अशी खंत उपराष्ट्रपती व्यंकय्या  नायडू यांनी व्यक्त केली. कृषी उत्पन्नाचे बाजार मूल्य शास्त्रीय पद्धतीने ठरवणे ही काळाची गरज असून त्या दृष्टीने सरकारने प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

येथील रेशीमबाग मैदानावर आयोजित नवव्या अ‍ॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन नायडू यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री आणि अ‍ॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महादेव जानकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शेतकरी मोठय़ा प्रमाणात शेतमालाचे उत्पादन करतो. मात्र, त्याला त्याचे दर ठरविण्याचे अधिकार नाही. स्वातंत्र्यानंतर अनेक सरकारे आली, पण शेतकरी हा दुर्लक्षितच राहिला. शेती आणि उद्योग देशाचे दोन डोळे आहेत.

उद्योग क्षेत्राचा विकास झपाटय़ाने प्रगत होत असला तरी शेतीचा विकास झाला नाही याकडे नायडू यांनी लक्ष वेधले.

अ‍ॅग्रोव्हिजनचे उद्घाटन सुविधा देण्याची जबाबदारी सरकारवर

शेतक ऱ्यांना फुकट काहीच नको, केवळ वीज, चांगले रस्ते, सिंचन आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिली तर ते कर्जमाफी मागणार नाही. या सुविधा देण्याची जबाबदारी सरकारची आहे. शेतक ऱ्यांची स्थिती गंभीर आहे. ते आपल्या मुलांना शेतीपासून दूर ठेवू लागले आहे. ही चांगली बाब नाही. कृषी क्षेत्राला न्याय देण्यासाठी राज्य सरकारने कृषी क्षेत्रातील अर्थसंकल्पात तरतूद वाढवणे गरजेचे आहे देश म्हणजे केवळ शहरे नाही, तर ग्रामीण भारतही महत्त्वाचा आहे, असे नायडू म्हणाले. मुख्यमंत्री हे जाणून आहे आणि त्यावर ते काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Government ignoring agriculture sector says vice president venkaiah naidu