करोना, निधीची कमतरता यांमुळे वंधत्व निवारणाच्या प्रयत्नाला खीळ

महेश बोकडे

नागपूर : मध्य भारतातील महिलांमधील वंधत्वाची समस्या सोडवण्यासाठी गेल्यावर्षी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) प्रशासनाने पुढाकार घेत येथे राज्यातील पहिल्या शासकीय आयव्हीएफ (इन व्रिटो गर्भधारणा) प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला होता. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास राज्यातील इतरही भागात तो उभारण्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी तत्कालीन वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दर्शवली होती. परंतु विविध कारणांनी या प्रकल्पाची ‘भ्रूणहत्या’ झाल्याची माहिती आहे.

आई होणे प्रत्येक स्त्रीसाठी आनंदाची गोष्ट आहे. परंतु काही समस्यांमुळे काही स्त्रियांच्या गर्भधारणेत अडचणी येतात. अशा महिलांसाठी आयव्हीएफ पद्धत उपयुक्त आहे. सध्या ही उपचार पद्धती केवळ खासगी रुग्णालयांत उपलब्ध आहे. त्यासाठी खूप खर्च येतो. त्यामुळे अनेक मध्यमवर्गीय याचा लाभ घेऊ शकत नाही. सध्या राज्यातील एकाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत हे केंद्र नाही. परंतु मेडिकलमध्ये हे केंद्र तयार करण्यावर गेल्यावर्षी शिक्कामोर्तब झाले होते. या प्रकल्पासाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षांत जिल्हा नियोजन समितीकडून ९५ लाखांची तरतूद झाली होती.  तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या सूचनेनुसार कामही सुरू झाले होते. या योजनेला प्रोत्साहन देत तत्कालीन वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी हा प्रकल्प राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे लोकसत्ताला सांगितले होते. परंतु करोनाची दुसरी लाट, निधी व इतर अडचणींमुळे हा प्रस्ताव थंडबस्त्यात गेल्याची सूत्रांची माहिती आहे.

३५ टक्के महिलांना नैसर्गिक गर्भधारणेत अडचण

स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञांच्या निरीक्षणासह जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार,  विविध समस्यांमुळे स्त्रियांमधील वंधत्वाचे प्रमाण वाढत आहे.  सध्या २५ ते ३५ टक्के महिलांना नैसर्गिक गर्भधारणेस अडचण येऊ  शकते. अशा वंधत्वावर आयव्हीएफ पद्धती फायद्याची आहे. परंतु त्यासाठी तज्ज्ञांचे निरीक्षण, अद्ययावत पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत.

मेडिकलमध्ये प्रस्तावित आयव्हीएफ केंद्राच्या प्रस्तावाची माहिती घेऊन तातडीने ते येथे कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जातील. हा प्रकल्प येथे झाल्यास गरीब व मध्यमवर्गीयांना लाभ होऊ शकेल.

डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल.