आता अतिरिक्त शपथपत्र दाखल करणार
नागपूर : राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात भटके, विमुक्त व विशेष मागास प्रवर्गाचे पदोन्नतीतील आरक्षण असंविधानिक असल्याचे म्हटल्याने समाजात संतापाची लाट उसळली. यानंतर सरकारला जाग आली. आता अतिरिक्त शपथपत्र दाखल करून चूक दुरुस्त करण्यात येणार आहे.
मागासवर्गीयांची पदोन्नती व सरळ सेवेतील प्रतिनिधित्वाची माहिती संकलित करून त्यांचे शासन सेवेतील आरक्षण निश्चित करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सादर केला. तो अहवाल राज्य सरकारने पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्य न्यायालयात असलेल्या विशेष अनुमती याचिकेवरील शपथपत्रासोबत जोडला. सर्वोच्च न्ययालयातील शपथपत्रावरून राज्य सरकारवर सर्वच स्तरातून टीका झाली. त्यामुळे सरकारला उशिरा का होईना शहाणपण सुचले.
या शपथपत्रात पान क्रमांक ४० व ४२ मध्ये समितीचे निष्कर्ष आहेत. यात भटके विमुक्त व विशेष मागास प्रवर्गाबाबत पदोन्नतीतील ‘आरक्षण असंविधानिक आहे’ असे नमूद करण्यात आले आहे. भटके-विमुक्त व विशेष मागास प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्याची तरतूद राज्यघटनेत नाही. तेव्हा त्यांना पदोन्नतीत आरक्षण देणे वैध ठरणार नाही.
या घटकाला पदोन्नतीत आरक्षण मिळावे याकरिता केंद्र सरकारने राज्यघटेनेत दुरुस्ती करावी, अशी शिफारस करण्याची आवश्यकता आहे. तेव्हाच त्यांना पदोन्नतीत आरक्षणाला मान्यता देता येईल, असे नमूद करण्यात आले आहे.
राज्य सरकारतर्फे १९ सप्टेंबर २०२१ ला सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यात आले. त्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली. राज्य सरकारने नव्याने शपथपत्र दाखल करण्याची मागणी विविध संघटनांनी केली. त्यानंतर आज सरकारने अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भटके-विमुक्त व विशेष मागास प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीत आरक्षण कायम राहणार आहे.
वास्तविक सर्वोच्च न्यायालयात अपेक्षित असणाऱ्या मुद्यांपैकी मागासवर्गीयांचे अपुरे प्रतिनिधित्व, त्यांचे मागासलेपण सिद्ध करणे, प्रशासनातील कार्यक्षमता सादर करणे अपेक्षित होते. कारण ते उच्च न्यायालयात सादर केले नव्हते. त्यामुळे उच्च न्यायालयाने पदोन्नती आरक्षण जीआर २००४ रद्द केला. पण समितीने चुकीच्या पद्धतीने भटके, विमुक्त, विशेष मागास प्रवर्गातील लोकांना न्याय हक्कापासून वंचित केले, असा दावा भटके-विमुक्त हक्क परिषदेचे अध्यक्ष महेश गिरी यांनी केला.
