नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याविरोधात काही प्राधिकरण सदस्यांनी कंबर कसली आहे. कुलगुरूंनी विधिसभेची बैठक दोन मिनिटात गुंडाळून लोकशाहीची हत्या केली. यावरून कुलगुरूंविरोधात कुलपती भगत सिंह कोश्यारी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी प्राधिकरण सदस्यांनी केली आहे. यामुळे माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांच्या प्रकरणाची पुनरावृत्ती होणार का? अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात रंगली आहे.

विद्यापीठाची स्थगित बैठक २१ मार्च रोजी घेण्यात आली. सभा सुरू होताच प्राचार्य डॉ. सातपुते यांनी विसर्जित करण्याचा प्रस्ताव सादर केला. तो मान्य करीत कुलगुरूंनी सभा विसर्जित केली. त्यावरून सदस्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेत कुलसचिवांना घेराव घातला. याशिवाय, विद्यापीठाच्या बजाज भवनासमोर ठिय्या मांडून घोषणाबाजी केली. पाच तासानंतर कुलगुरू कार्यालयात आले असता त्यांचा घेराव करीत, विधिसभा बैठक पुन्हा घेण्याची मागणी सदस्यांनी केली. यानंतर विसर्जित सभा ४ किंवा ५ एप्रिलला घेण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले. मात्र, अद्याप याबाबत कुठलेही पत्र विद्यापीठाने काढले नाही. यावरून कुलगुरूंना स्वत:च्याच आश्वासनाचा विसर पडल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.

विधिसभेच्या कार्यकाळातील ही शेवटची बैठक होती. आगामी काळात विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणुका होणार आहेत. त्यातच पीएच.डी.साठी विद्यार्थिनींचा मानसिक आणि आर्थिक छळ करण्यात आल्याच्या तक्रारीमुळे शैक्षणिक वर्तुळातील वातावरण तापले आहे. याशिवाय, विद्यापीठ प्रशासनाला यापूर्वी अनेकदा अडचणीत आणणाऱ्या ‘एमकेसीएल’ या संस्थेला सर्वाचा विरोध असतानाही कुलगुरू डॉ. चौधरी यांनी काम दिले. या आणि अशा विविध प्रकरणांवरून सदस्य चिडलेले आहेत. अशातच, विधिसभेची बैठकही रद्द करण्यात आल्यामुळे त्यात भर पडली आहे. विधिसभा सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून कुलगुरूंविरोधात राज्यपालांसह यूजीसी आणि उदय सामंत यांच्याकडे तक्रार केली जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात विद्यापीठाच्या राजकारणात नवीन घडामोडी दिसून येणार आहेत.