लोकसत्ता टीम

गडचिरोली : राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारचा गडचिरोलीतील मौल्यवान खनिजांवर डोळा आहे. हे खनिज देशातील उद्योगपतींना कवडीमोल दरात देण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत जिल्ह्यात लोह प्रकल्पाच्या भूमिपूजनाकरिता आलेले असताना चकमक घडविण्यात आली, असा आरोप करीत नक्षलवाद्यांनी राज्य सरकारवर आगपाखड केली आहे.

१७ जुलै रोजी एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस हद्दीत येणाऱ्या वांडोली गावानजीक पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली होती. यात तीन मोठ्या नेत्यांसह कसनसूर, कोरची, टिपागड, चातगाव दलमलचे १२ नक्षलवादी ठार झाले होते. या चकमकीनंतर उत्तर गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळ संपुष्टात आल्याचे पोलिसांनी जाहीर केले होते. त्यानंतर तब्बल २३ दिवसांनी नक्षलवाद्यांच्या पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने १० ऑगस्ट रोजी पत्रक जारी केले आहे. यामध्ये चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच चकमकीवर प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.

आणखी वाचा-यवतमाळ : थॅलेसेमिया, सिकलसेलचे १५ हजार रुग्ण, सुविधांअभावी पाच दगावले?

गडचिरोली जिल्ह्यात असलेले मौल्यवान खनिज देशातील आणि विदेशातील उद्योगपतींना कवडीमोल दरात देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. १७ जुलै रोजी अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत लोह प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी आले होते. नेमकी त्याच दिवशी संधी साधून ही चकमक घडविण्यात आली, असा आरोपही पत्रकात करण्यात आला आहे. सोबतच ठार झालेल्या १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात येऊन त्यांच्यावर सन्मानजनक अंतिमसंस्कार करण्यात यावे, असेही यात नमूद केले आहे.

सूड घेण्याची धमकी

वांडोली चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा झालेला मृत्यू नक्षलवाद्यांच्या चांगला जिव्हारी लागला आहे. गेल्या काही वर्षांपासून गडचिरोली पोलिसांनी केलेल्या आक्रमक नक्षलविरोधी कारवायामुळे हिंसक नक्षलवादी चळवळीची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली आहे. त्यामुळे बिथरलेल्या नक्षल नेत्यांनी सूड घेणार, अशी धमकी पत्रकातून दिली आहे.

आणखी वाचा-‘‘हत्तीरोग बाधितांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र द्या,’’ केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचे निर्देश

नैराश्यातून तथ्यहीन आरोप – पोलीस अधीक्षक

वांडोली चकमकीनंतर काही दिवसातच मृत नक्षलवाद्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करण्यात आला. आतापर्यंत नऊ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलीस विभागाने त्यांच्या घरच्यांना स्वखर्चातून सन्मानजनकपणे सुपूर्द केले आहे. उर्वरित तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह छत्तीसगडमधील असून त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करण्यात आला आहे. त्यांचा निरोप येताच हे मृतदेहदेखील पोहोचवून देण्यात येतील. चारही बाजूने झालेल्या कोंडीमुळे नक्षलवादी निराश झाले असून त्यातूनच तथ्यहीन आरोप करीत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले आहे.