नागपूर : एसआयआरची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या राज्याला मिळणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर, जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रावरून ग्राम विकास विभागाने ग्रामपंचायतींमधील सरपंचांसाठी आरक्षित ५० टक्क्यांवरील पदे हे खुल्या वर्गात वर्ग करण्याचे आदेश काढले. त्यामुळे ५० टक्क्यांवरील जागा कशा पद्धतीने निश्चित करायच्या आणि फक्त ओबीसींच्या जागांमधील महिला आरक्षणासाठी चिठ्ठ्या काढायच्या की सर्वच वर्गातील महिलांसाठी आरक्षित जागा या चिठ्ठ्या काढून निश्चित करायच्या, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
५० टक्केच्या मर्यादेत जागा आरक्षित
स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींसाठी २७ टक्केपर्यंत आरक्षण निश्चित करण्याची तरतूद कायद्यात आहे. परंतु राज्य निवडणूक आयोगाने २७ टक्के आरक्षण निश्चित करण्याच्या सूचना निवडणूक प्रशासनाला दिल्यात. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील नगर पंचायती, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतमधील आरक्षणाची टक्केवारी ५० वर गेली. त्यामुळे याला पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. यावर न्यायालयाकडून स्थगिती दिली नसल्याने नगर पंचायती, नगरपालिका, महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या. तर ५० टक्केच्या मर्यादेत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यात आल्या.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण ५० टक्केच्या मर्यादेत ठेवण्याचे आदेश काढलेत. त्यामुळे सरपंचपदासाठी आरक्षित ५० टक्क्यांवरील पदे खुल्या वर्गात वर्ग केले जाणार आहेत. एससी व एसटीचे आरक्षण कायम राहणार असल्याने ओबीसींचे आरक्षण कमी करण्याचे आदेश देण्यात आले.
आयोगाच्या सूचनांकडे लक्ष
५० टक्क्यांवरील ओबीसींची पदे हे खुल्या वर्गात वर्ग करण्यात येतील. त्यामुळे आगामी ग्रा.पं.सह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महिला आरक्षण हे नव्याने निश्चित करावे लागणार आहे. महिला आरक्षण हे फक्त अतिरिक्त ठरलेल्या जागांसाठी निश्चित करायचे की संपूर्ण ओबीसी जागांसाठी करायचे की एकूणच जागासाठी नव्याने महिला आरक्षण निश्चित करायचे, हे अद्याप स्पष्ट नाही. याबाबत प्रशासनातही संभ्रमावस्था आहे. त्यामुळे यासंदर्भात आयोगाकडून काय सूचना येतात, याचीच प्रतीक्षा प्रशासनाला आहे.
जिल्हा परिषदांमध्ये हाच नियम लागू होणार?
राज्यातील २० जिल्हा परिषद आणि संबंधित पंचायती समित्यांमध्ये आरक्षणाची टक्केवारी ५० वर गेली आहे. ग्रामपंचायतींसाठी लागू करण्यात आलेला ५० टक्के मर्यादेचा नियम जिल्हा परिषदेला सुद्धा लागू होईल. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील ५० टक्क्यांवरील ओबीसींच्या जागा या खुल्या वर्गात वर्ग होतील, असे निवडणूक शाखेमधील जाणकारांचे मत आहे. त्यामुळे महिला आरक्षणाचा मुद्दा येथेही उपस्थित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नव्याने महिला आरक्षण निश्चित करण्याची मागणी
आरक्षण ५० टक्क्यांवर गेल्याने ओबीसींच्या जागा कमी होतील. त्यामुळे महिलांसाठी नव्याने आरक्षण काढावे लागेल. फक्त ओबीसी महिलांसाठी आरक्षण निश्चित न करता सर्वच वर्गातील महिलांसाठी नव्याने आरक्षण काढायला पाहिजे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते आतिश उमरे यांनी केली आहे
