एक वर्षाच्या नातवासोबत शेतात गेलेल्या महिलेला बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवारी अहेरी तालुक्यातील कोलपल्ली येथे घडली. मैना श्यामराव सडमेक (४५) असे जखमी महिलेचे नाव असून सोबत असलेला एक वर्षाचा नातूदेखील जखमी झाला आहे. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास मैना सडमेक नेहमीप्रमाणे आपल्या एक वर्षाच्या नातवाला सोबत घेऊन शेतावर गेल्या होत्या. दरम्यान, जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने दोघांवरही हल्ला चढविला.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरड केली असता जवळ असलेल्या नागरिकांनी बिबट्याला हुसकावून लावल्याने मोठा अनर्थ टळला. हल्ल्यात जखमी झालेल्या आजी व नातवाला तत्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वन विभागाने जखमींना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. मागील काही वर्षांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.