नागपूर : शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामधून अनेक गुणवंत विद्यार्थी आयुष्याला आकार देत आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या वसतिगृहातील पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारे नामांकित खासगी कंपन्यांमध्ये निवड झाली असून त्यांना १३ ते २१ लाखापर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.

सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी तालुका, जिल्हा तसेच विभागीय स्तरावरील वसतिगृहे सुरू आहेत. यामध्ये वसतिगृहाच्या स्वरुपानुसार कनिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक महाविद्यालय, बिगर व्यावसायिक वरिष्ठ महाविद्यालय तसेच विद्यालय स्तरावर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. प्रितेश अमोल शंभरकर या चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यानगर ब्रह्मपुरी येथील विद्यार्थ्याने येथील ‘सीईओपी’मध्ये २०१९-२३ साठी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. त्याला संत ज्ञानेश्वर शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला. त्याचीही ‘सोसायटी जनरल’ या कंपनीत वार्षिक वेतन १४ लाख ९६ हजार रुपयांच्या पॅकेजवर निवड झाली आहे.

हेही वाचा : खोट्या देयकाच्या आधारे कोट्यवधींची करचोरी, नागपूरच्या व्यापाऱ्याला अटक

अशाच पद्धतीने नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा, तालुका नरखेड येथील पीयूष संजय चापले यानेही अत्यंत कठीण परिस्थितीशी तोंड देत यश मिळवले आहे. त्याची कॅम्पस मुलाखतीद्वारे १२ लाख ८१ हजारांच्या वार्षिक पॅकेजवर निवड झाली आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे विभागाचे सचिव सुमंत भांगे, विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नरनवरे, उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी अभिनंदन केले.