वर्धा : प्रथम गिधाडे आणि आता हा पक्षी. नामशेष होण्याच्या मार्गावर. पण तो मार्ग खुंटणार. अत्यंत दुर्मिळ पण आता हा जीव पुरेसा संख्येत. केंद्र व विविध राज्य शासनांनी असे दुर्मिळ जीव, प्राणी, झाडे यांचे संगोपन करण्याचा विडा उचलला आणि त्यास लक्षवेधी यश येवू लागले. कुनोच्या चित्त्यांचे पालन पोषण तर नजरेत भरत आहे. आता ही सुवार्ता.
या पक्ष्यास नवसंजीवनी
अतिशय दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या आणि नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या ‘माळढोक’ (ग्रेट इंडियन बस्टार्ड – GIB) या पक्ष्याला नवसंजीवन देण्यासाठी चालवण्यात येत असलेल्या प्रकल्पाने इतिहास रचला. राजस्थानमधील जैसलमेर येथील ‘डेझर्ट नॅशनल पार्क’ (Desert National Park) मध्ये मानवी देखरेखीखाली अन् कृत्रिम गर्भाधानाद्वारे जन्मलेल्या दोन माळढोक पक्ष्यांना प्रथमच मुक्त नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे. वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हा भारतीय पर्यावरण क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
नामशेषाच्या छायेतून आशेचा दीप
एक काळ असा होता की पंजाबपासून थेट तामिळनाडूपर्यंत माळढोक पक्ष्यांचा संचार पहायला मिळायचा. परंतु कुरणांची झालेली प्रचंड धूप, अनियंत्रित शिकार आणि हाय-व्होल्टेज वीजवाहिन्यांचे जाळे यांमुळे या पक्ष्यांची संख्या वेगाने घटली. आजच्या घडीला संपूर्ण देशभरात अवघे १५० पेक्षाही कमी माळढोक जिवंत उरले असून, प्रामुख्याने राजस्थान आणि गुजरातच्या कच्छ भागातच त्यांचे अस्तित्व टिकून आहे.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, माळढोक पक्ष्यांची समोर बघण्याची दृष्टी (Front Vision) तुलनेने कमकुवत असल्याने आकाशात उडताना त्यांना उच्च दाबाच्या वीजवाहिन्या दिसत नाहीत आणि धडक बसून त्यांचा जागीच मृत्यू होतो.
री-वाइल्डिंगचे ९.२५ कोटींचे विशेष प्रशिक्षण
२०१६ मध्ये केंद्र सरकार आणि वन्यजीव संस्थेने (WII) रामदेवरा येथे माळढोक पैदास केंद्र सुरू केले होते. जून २०२६ पर्यंत या केंद्रात पक्ष्यांची संख्या ९८ पर्यंत पोहोचली असून, त्यातील ३८ पक्ष्यांचा जन्म कृत्रिम गर्भाधानातून झाला आहे. नैसर्गिक वाळवंटात सोडण्यापूर्वी या पक्ष्यांना ९.२५ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या विशेष टनेलमध्ये Rewilding Training चे कठोर प्रशिक्षण देण्यात आले. यात त्यांना स्वतः शिकार शोधणे, कीटक टिपणे आणि नैसर्गिक हवामानाशी जुळवून घेण्याचे धडे देण्यात आले.
माळढोक संवर्धन प्रकल्प
एकूण उरलेली संख्या – १५० पेक्षा कमी (संपूर्ण भारतात).
प्रजनन केंद्रातील संख्या – ९८ पक्षी (३८ कृत्रिम गर्भाधानातून).
री-वाइल्डिंग प्रकल्प खर्च ९.२५ कोटी रुपये.
भविष्यातील दिशा व आव्हान
भारतीय वन्यजीव संस्थेचे (WII) तज्ज्ञ आता सॅटेलाइट आणि प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे हे पक्षी निसर्गात तग धरतात का आणि प्रजनन करतात का, यावर लक्ष ठेवणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास गुजरातच्या कच्छ भागात आणि त्यानंतर महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील जुन्या अधिवासांमध्येही या पक्ष्यांना पुन्हा वसविले जाईल. मात्र, पक्षीप्रेमी म्हणतात, केवळ पक्षी तयार करणे पुरेसे नाही तर वीजवाहिन्या भूमितल करणे आणि त्यांचे अधिवास सुरक्षित ठेवणे हाच माळढोकला वाचविण्याचा कायम मार्ग आहे.पण कृत्रिम पद्धतीने जीव संवर्धन करण्याचा उपक्रम यशस्वी गाथा ठरणार.
