नागपूर: ग्रेट व्हाईट ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड (इलेक्ट्रिक ॲक्सेसरीज उत्पादक)कडून नागपुरात विद्युत साहित्य निर्मिती प्रकल्प उभारण्याबाबत चाचपणी सुरू आहे. त्यानुसार येथे सुमारे ३०० कोटींचा विद्युत साहित्य निर्मितीचा प्रकल्प उभारणीचा प्रयत्न आहे, अशी माहिती कंपनीचे संस्थापक कैलाश दिडवानिया यांनी दिली. प्रेस क्लबमध्ये सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिडवानिया म्हणाले, कंपनीकडून मिहान आणि एमआयडीसीमध्ये जागा उपलब्धतेबाबत लवकरच चाचपणी केली जाईल. त्यानंतर येथे विद्युत साहित्य निर्मिती सुरू केली जाईल. नागपूर हे देशाच्या मध्यभागी असून येथून विद्युत साहित्याची कुठेही वाहतूक सोप्या पद्धतीने करणे शक्य आहे. त्यामुळे कंपनी येथे आपला विस्तार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. हेही वाचा. नागपूरच्या खेळाडूंनी फिलिपिन्समध्ये जिंकली अकरा पदके कंपनीची देश- विदेशात सध्या १,४०० कोटी रुपयांची उलाढाल असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी चिराग बोराडिया, संदीप मिश्रा, गोविंद पसारी, मेहुल मारू, ऋषी दलाल, संदीप धुंदे, राहुल घरत, गोपाल ठाकूर, मंजित सिंग उपस्थित होते.