गडचिरोली : समाजातील दुर्लक्षित घटकावर होणाऱ्या अन्याय, शोषणाविरुद्ध लढा देत असल्याचा दावा करणाऱ्या हिंसक नक्षलवादी चळवळीचे दोन वेगळे चेहरे समोर आले आहे. एकीकडे बिहार, झारखंड राज्यात कुटुंबियांच्या उच्च शिक्षणासाठी खंडणी उकळणारे तर दुसरीकडे गडचिरोली, छत्तीसगडमध्ये दोनवेळच्या अन्नासाठी वणवण भटकनाऱ्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणारे. त्यामुळे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

काही दिवसांपूर्वी बिहारच्या मगध झोनमध्ये कार्यरत असलेल्या एका नक्षलवादी नेत्याने बिहार आणि झारखंड भागातील कंत्राटदार व अधिकाऱ्यांकडून कोट्यावधीची खंडणी उकळली होती. हे पैसे त्या नक्षलवादी नेत्याच्या कुटुंबातील सदस्याला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी देण्यात आले. एका कोटींपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारावर पोलिसांना शंका आल्यानंतर हे बिंग फुटले. याप्रकरणी दोन सदस्यांना अटक करण्यात आली. त्यातील एकाच्या बहिणीसाठी ही रक्कम भरण्यात आली होती. हे केवळ एकच प्रकरण नसून आणखी काही नक्षल नेत्यांनी सुद्धा अशाच कामासाठी खंडणी वसूल केल्याचा संशय पोलिसांनी आहे.

आणखी वाचा-१७ वर्षांपासून एका फाईलवर कसे बसू शकता? भूखंड घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

तर दुसरीकडे गडचिरोली आणि छत्तीसगडमध्ये नक्षल्यांचे कुटुंब वाऱ्यावर असल्याचे दयनीय चित्र आहे. मागील काही महिन्यांपासून नक्षल्यांविरोधात पोलिसांनी चालविलेल्या अभियानात १३५ हून अधिक नक्षलवादी ठार झालेत. गडचिरोलीतही नाममात्र शिल्लक आहेत. चकमकीत अनेक नेते ठार झाल्याने ही हिंसक चळवळ दिशाहीन झाली आहे. पण त्याहीपेक्षा त्यांचे कुटुंब प्रचंड अडचणीत जीवन जगत आहे. घरातील कर्ता पुरुष किंवा स्त्रीने हातात शस्त्र घेतले. त्यामुळे घरातील वृद्ध, लहान मुले रस्त्यावर आली. कित्येक वर्ष त्यांचा कुटुंबियांशी संपर्क नाही. घरात कमावता कुणी नसल्याने अनेकांच्या नातेवाईकांना दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागतो आहे. यातील काहींशी संवाद साधला असता त्यांची दयनीय व्यथा पुढे आली. त्यामुळे एकाच चळवळीतील दोन चेहरे समोर आले आहे.

आणखी वाचा-पालकमंत्री पद झेपणार नाही, हे अजित पवारांना आधीच…

मोठे नेते आत्मसमर्पणाच्या तयारीत?

देशात नक्षलवाद संपविण्यासाठी केंद्र सरकारने मोठी पाऊले उचलली आहे. मागील काही महिन्यात झालेल्या विविध चकमकीत छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड सारख्या राज्यात शेकडो नक्षलवादी मारल्या गेले. त्यामुळे ही चळवळ खिळखिळी झाली आहे. आता पोलिसांनी अबुझमाडकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यात प्रचंड अस्वस्थता असल्याचे कळते. यामुळे येत्या काही दिवसात नक्षल्यांचे मोठे नेते आत्मासमर्पण करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ऐन उमेदीच्या काळात दिशाभूल करून तरुणांना या हिंसक चळवळीत सामील करून घेतले. यामुळे त्यांचे कुटुंब प्रचंड दयनीय अवस्थेत जीवन जगत आहेत. वृद्ध आईवडील आधारहीन झाले आहेत. त्यांचा विचार करून नक्षल्यांनी शस्त्र खाली टाकून मुख्य प्रवाहात यायला पाहिजे. -नीलोत्पल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली