नागपूर : मध्यपूर्व आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरातील व्यावसायिक एलपीजी गॅस पुरवठा विस्कळीत झाला असून त्याचा थेट परिणाम विदर्भातील बेकरी उद्योगावर झाला आहे. गॅसअभावी विदर्भात पार्ले-जी बिस्कीट तयार करणारे दोन कारखाने बंद पडले आहेत. त्याचबरोबर नागपुरातील हल्दीराम आणि अजित बेकरीच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. अनेक कंपन्या पर्याय म्हणून डिझेल व इलेक्ट्रिक ओव्हनकडे वळण्याचा प्रयत्न करत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमधील ‘शिवांगी बेकर्स’मध्ये ‘क्रीम’ व ‘ग्लुकोज’ बिस्किटांचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी मोठ्या आकाराच्या विशिष्ट गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. मात्र व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने उत्पादन ११ मार्चपासून ठप्प झाले आहे. त्यामुळे सुमारे पाचशे कामगार रोज हजेरी लावून परत जात आहेत.
कंपनीने वेतन निम्म्यावर आणल्याने कामगार संतप्त झाले असून किमान वेतन देण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे, असे कामगार नेते दीपक सुलताने यांनी सांगितले. पार्ले-जी बिस्किटांचे उत्पादन करणाऱ्या इतरही भागातील कंपन्यांमध्ये गॅसटंचाईचा गंभीर परिणाम झाला असून उत्पादन घटल्याचेही त्यांनी सांगितले. त्याच बरोबर नागपूर जिल्ह्यातील बहादुरा येथील ‘शिवम बेकर्स’ या कंपनीनेही पार्लेजी बिस्कीट तयार करणे थांबवले आहे.
हल्दीरामलाही फटका
राज्यात मिठाई व फरसाण उत्पादनात अग्रस्थानी असलेल्या हल्दीरामच्या काही उत्पादनालाही गॅस टंचाईची झळ पोहचली आहे. १२५ रेस्टॉरंटमध्ये गॅस तुटवड्यामुळे चायनीज खाद्यपदार्थ बंद करण्यात आले आहेत. या उद्योग समूहाने पूर्वीपासूनच खाद्यपदार्थ निर्मितीसाठी स्वयंचलित इलेक्ट्रिक यंत्राचा वापर सुरू केला होता. पण तरीही निवडक पदार्थांसाठी एलपीजी सिलिंडरचा वापर केला जात होता.
त्याच्या उत्पादनावर अंशत: परिणाम झाला आहे. काही ओव्हन डिझेलवर रूपांतरित करण्यात आले असले तरी पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू होऊ शकलेले नाही. राज्यभरातील सुमारे १२५ रेस्टॉरंटमध्ये गॅस तुटवड्यामुळे चायनीज खाद्यपदार्थ बंद करण्यात आले आहेत. तसेच कामगारांच्या जेवणात एकवेळ पोळी देणे बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी भाताचे प्रमाण वाढवण्यात आले आहे.
‘अजित बेकरी’च्या बिस्कीट उत्पादनावर मर्यादा
बिस्कीट, ब्रेड निर्मिती क्षेत्रातील विदर्भातील आणखी एक नामांकित ब्रॅण्ड नागपूरच्या अजित बेकरीनेही सिलिंडर टंचाईमुळे बिस्कीट निर्मिती मर्यादित केली आहे. या कंपनीकडून संरक्षण दलासह रुग्णालयांना ब्रेड पुरवठा केला जातो. बेकरीचे संचालक विक्रम दिवाडकर म्हणाले, रुग्णालये व संरक्षण दलासाठी ब्रेडचा पुरवठा बंद किंवा कमी करता येत नाही. त्यामुळे त्याला प्राधान्य देण्यात आले आहे. गॅस तुटवडा लक्षात घेऊन अनेक ओव्हन डिझेल आणि इलेक्ट्रिकवर रूपांतरित करण्यात आले आहेत. तरीही बिस्कीट, कुकीज, खारीसह इतर काही उत्पादनांवर मर्यादा आणावी लागली आहे.
उत्पादन खर्चात वाढ
गॅस तुटवड्याचा फटका लहान बेकरी व्यावसायिकांनाही बसला आहे. इलेक्ट्रिक किंवा डिझेल ओव्हनचा पर्याय कंपन्यांनी स्वीकारल्याने त्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. स्पर्धात्मक बाजारपेठेत दरवाढ करणे शक्य नसल्याने वाढलेला खर्च कसा भरून काढायचा, हा प्रश्न या व्यावसायिकांसमोर निर्माण झाला आहे.
