वाशीम : लहान लहान राज्ये झाल्यास विकासाला चालना मिळते. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे. वेगळा विदर्भ व्हावा. ही फार जुनी मागणी आहे. अनेकांनी अनेकवेळा लढा दिला आहे. परंतु, वेगळा विदर्भ म्हटले की, शरद पवार, उद्धव ठाकरे यांचाच विरोध असतो. परंतु, भाजपा सरकारमुळे सध्या अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे विदर्भासाठी लोकतांत्रिक मार्गाने लढा उभारू, असे प्रतिपादन ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केले.
स्वतंत्र विदर्भ व्हावा, या मागणीसाठी आज विदर्भवादी संघटनेच्या वतीने शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ॲड. जयश्री पाटील, महेंद्र साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ॲड. सदावर्ते म्हणाले की, स्वतंत्र विदर्भ व्हावा, यासाठी अनेकांनी लढा दिला. मात्र, विदर्भाला शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे विरोध करतात. परंतु, सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपा सत्तेवर आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भाची आशा आहे. जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही, तोपर्यंत स्वतंत्र विदर्भ लोकसेवा आयोग स्थापन करून सर्वच नोकऱ्यांत विदर्भातील तरुणांना प्राधान्य द्यावे. वेगळा विदर्भ होण्यासाठी री ऑर्गनायझेशन ऑफ स्टेट आयोग स्थापन करावा. स्वतंत्र विदर्भ करण्यासाठी लोकतांत्रिक मार्गाने आपण लढा देणार असल्याचेही सदावर्ते म्हणाले.