नागपूर : विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) माध्यमातून पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जात असल्याचा आरोप करीत नागपूर शहर काँग्रेसने सोमवारी निषेध मोर्चा काढला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीविरोधात घोषणा देत संविधान व लोकशाही मूल्यांच्या रक्षणाची मागणी करण्यात आली.

संविधान चौकातून मोर्चाला सुरुवात

शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या या मोर्चात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी ‘व्होट चोर गद्दी छोड़’, ‘तानाशाही नहीं चलेगी’ अशा घोषणा देण्यात आल्या. मतदार यादीतील पारदर्शकता आणि मतदारांच्या अधिकारांबाबत काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले.

मुख्य निवडणूक आयुक्तांचा मुखवटा

आंदोलनादरम्यान एका कार्यकर्त्याने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा मुखवटा परिधान केला होता. त्याच्या हातात प्रतीकात्मक बेड्या घालण्यात आल्या होत्या. या बेड्यांची साखळी शहर काँग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी हातात धरली होती. या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेबाबत काँग्रेसने आपला निषेध व्यक्त केला.

मोर्चा अडविल्यानंतर प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाणारा मोर्चा वाटेत अडविण्यात आला. त्यानंतर आंदोलकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी एसआयआर प्रक्रियेमुळे पात्र मतदारांच्या नावांवर परिणाम होत असल्याचा आरोप करीत घोषणा देण्यात आल्या. मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची मागणीही आंदोलकांनी केली.

काँग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांचा सहभाग

या आंदोलनात आमदार संजय मेश्राम, माजी आमदार अशोक धवड नागपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस, तसेच याज्ञवल्क्य जिचकार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखणे, पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम ठेवणे आणि संविधानिक व लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे, या मागण्या काँग्रेसकडून करण्यात आल्या.