अमरावती: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर काँग्रेस पक्षाने मोर्चे काढून निषेध व्यक्त केला. अमरावतीत ज्ञानेशकुमार यांच्या पुतळ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड काढण्यात आली.
काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वात अमरावतीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले. देशातील लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता धुळीस मिळवून एसआयआर (SIR) प्रणालीच्या माध्यमातून उघडपणे मत चोरी करणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक करावी, अशी आक्रमक मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे मागण्यांचे निवेदन सादर केले.
आयोगाच्या कारभारावर टीका
या निवेदनाद्वारे काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या संशयास्पद आणि पक्षपाती कारभारावर कडाडून टीका केली. संविधानाने दिलेल्या स्वायत्ततेचा गैरवापर करून निवडणूक आयोग आज सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले आहे. डिजिटल यंत्रणा आणि एसआयआरच्या माध्यमातून जनतेच्या मतांवर दरोडा टाकण्याचे काम उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असून, हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आणि संविधानाचा थेट अवमान करणारे कृत्य असल्याचा थेट आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.
‘पदावर राहण्याचा अधिकार नाही’
निवेदन सादर करताना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत म्हटले की, देशातील निवडणुका पारदर्शक, खुल्या आणि निःपक्षपाती वातावरणात घेणे ही निवडणूक आयोगाची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र, जबाबदार पदावर बसलेले मुख्य निवडणूक आयुक्त स्वतः मत चोरीच्या या षडयंत्रात सामील असल्याचा संशय बळावला आहे. अशा भ्रष्ट आणि लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या अधिकाऱ्याला पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अथवा कायदेशीर अधिकार राहिलेला नसून, त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
जनतेच्या मतदानाचा हक्क आणि लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरून शेवटपर्यंत संघर्ष करेल. संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई झाली नाही, तर अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदनात देण्यात आला. यावेळी खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, सुनील देशमुख, विलास इंगोले, मिलींद चिमोटे, बबलू शेखावत, भैय्या पवार, सुरेश रतावा यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, विविध आघाड्यांचे प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
