scorecardresearch

‘बुलेट’धारकांच्या ‘फटाक्यां’मुळे नागरिक हैराण ; वृद्ध, रुग्ण, पादचाऱ्यांना आवाजाचा त्रास

युवकांनी गेल्या काही दिवसांपासून नियमांना धाब्यावर बसवून अनेक ठिकाणी हैदोस घालणे सुरू केले आहे

अनिल कांबळे, लोकसत्ता

नागपूर : फटाकेसदृश्य आवाज करत धडधडत धावणाऱ्या ‘बुलेट’ दुचाकींचा शहरात हैदोस वाढला असून या बुलेटबाजांमुळे रस्त्यावरून जाणारे पादचारी, विशेषत: वृद्ध नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहतूक पोलिसांनी यावर आवर घालावा, अशी मागणी होऊ लागली आहे. 

शहरातील रस्त्यावरून धडधड करत धावणारी बुलेट ही दुचाकी तसे लक्षवेधी वाहन. पण अलीकडे ती वेगळय़ा प्रकारासाठी चर्चेत आहे. ‘बुलेट’च्या ‘सायलेन्सर’मध्ये बदल करून तरुण चालक फटाकेसदृश्य आवाज काढतात. यामुळे हे वाहन रस्त्यावरून जाताना इतरांचे लक्ष वेधून घेते. मात्र अनेकदा लोक दचकतातही. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व महिला आवाजामुळे घाबरतात, यातून रस्ते अपघातांची शक्यता बळावते.

सध्या नागपुरातील रस्त्यांवर अशा बुलेटबाजांची ‘धूम’ सुरू आहे. तरुणींचा घोळका दिसताच बुलेटबाजांना आणखी ‘हुरूप’ चढतो. वारंवार ‘फटाके’ वाजवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न बुलेटचालक करताना दिसतात. इतर वाहनांच्या तुलनेत महागडी असूनही ‘बुलेट’ची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. नोकरदार, महाविद्यालयीन युवक, व्यावसायिकांची ‘बुलेट’ला पसंती आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात ‘बुलेट’स्वारांचा मोठा वाटा आहे.

काही टारगट युवकांनी गेल्या काही दिवसांपासून नियमांना धाब्यावर बसवून अनेक ठिकाणी हैदोस घालणे सुरू केले आहे. शाळा-महाविद्यालये, दवाखाने अशा ‘सायलेंट झोन’ आणि प्रतिबंधित क्षेत्रात ‘बुलेट’चालकांकडून मर्यादा ओलांडली जाते. अनेकदा गर्दीत ‘फटाके’ फोडत नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यावर आळा घालण्यास पोलीस विभाग अपयशी ठरत आहे. त्यांच्या निष्क्रियतेमुळे हा प्रकार दिवसेंदिवस अधिक वाढू लागला आहे. 

वाहतूक पोलिसांकडून वारंवार फटाकेबाज बुलेट चालकांवर कारवाई केली जाते. कारवाईदरम्यान वाहने जप्त केली जातात. आतापर्यंत अडीच हजारांवर ‘सायलेंसर’ जप्त करण्यात आले आहेत.’’

सारंग आवाड, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा.

गॅरेज मालकांवरही कारवाई व्हावी

दुचाकीतून (बुलेट) फटाका फुटल्यासारखा आवाज यावा म्हणून गॅरेजमध्ये नेऊन त्यात तांत्रिक बदल केला जातो. हे बदल नियमांचे उल्लंघन आहे. यासाठी बुलेटस्वारांसह अवैधपणे तांत्रिक बदल करून देणाऱ्या गॅरेजचालकांवर वाहतूक पोलिसांसह तत्सम यंत्रणेने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

विशेष मोहिमेची गरज

फटाकेबाज बुलेट चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी. बुलेटवर फक्त चालान कारवाई न करता ती काही दिवसांसाठी जप्त करण्यात यावी. जेणेकरून हा प्रकार होणार नाही, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

टवाळखोरांचा उपद्व्याप

बाजार, गजबजलेले चौक, महाविद्यालये, शिकवणी वर्ग आणि उद्यानांजवळ बुलेटचालक फटाकेबाजांचा हैदोस अधिक असतो. महिला, तरुणींचे लक्ष वेधण्यासाठी हा सर्व उपद्वय़ाप केला जातो. यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Harassment of citizens due to noise pollution by modified bikes zws