नागपूर: मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये वादाची ठिणगी उडाली आहे. दोघे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत फडणवीस यांनी सपकाळ यांना सडेतोड उत्तर दिल्यावर आज सपकाळ यांनी भाजप च्या अनेक नेत्यांची नावे एपस्टिन फाईल्समध्ये आल्यामुळे ते घाबरले आहेत. यामुळे लोकांना मूळ विषयावरून भरकटवण्यासाठी आणि राज्यात दंगली घडवण्यासाठी ते अशा प्रकारचे आरोप करत सुटल्याची टीका सपकाळ यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत, आन, बान, शान आहेत, त्यांचा पराक्रम अद्वितीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणेतून संविधानाची निर्मिती झाली आहे. भाजपकडून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकण्याची गरज नाही. एपस्टिन फाईल्समध्ये भाजपाच्या नेत्यांची नावे आली आहेत, अमेरिकेबरोबरचा व्यापार कराराचा मुद्दा आहे आणि राज्यातही ज्वलंत मुद्दे आहेत, या मुळ मुद्यांना बगल देण्यासाठी भाजपाकडून माझ्या वक्तव्याची मोडतोड करून “ध” चा “मा” करून राज्यात दंगली घडवायच्या आहेत, याचा प्रत्यय आज पुण्यात आला, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर केला आहे.
सपकाळ यांनी पुढे सांगितले की, मला माफी मागायला लावण्याची भाषा माफीवीरांचा पक्ष करत आहे. परंतु टिपू सुलतानच्या मुद्द्यावर बोलताना भाजपा व देवेंद्र फडणवीस हे विसरत आहेत की, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या बॅनर्स व पोस्टर्सवर टिपू सुलतानचे फोटो होते. भाजपाने राज्यात अमरावती चंद्रपूरसह २१ ठिकाणी धर्मांध एमआयएमशी युती केली आहे, हे भाजपाला चालते, मग आताच काय झालं.
भाजपा काँग्रेस कार्यालयावर मोर्चा आणणार आणि १७ तारखेला माझे पुतळे जाळणार आहे, अशी माहिती मिळत आहे. मग सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याला ‘काततीय योग’ (कावळा बसायला आणि फांदी तुटायला….) असे म्हटले आहे. सावरकरांनी महाराजांबद्दल जे विकृत लिखाण केले आहे तसेच भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जी वक्तव्ये केली, त्याबद्दल भाजपा सावरकर आणि कोश्यारी यांचे पुतळे जाळणार का? असा माझा प्रश्न आहे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
फडणवीस काय म्हणाले होते?
हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, टिपू सुलतान सारख्या व्यक्तीची तुलना ते छत्रपती शिवरायांसोबत करत आहेत, हे अत्यंत निंदनीय काम आहे. छत्रपतींनी स्वराज्य उभारलं, मोगलांच्या जोखडांतून सामान्य माणसाला मुक्त केलं. खऱ्या अर्थाने त्यांनी सामान्य रयतेचे राज्य स्थापन केलं. तर दुसरीकडे टिपू सुलतानने हजारो लाखो हिंदूंची हत्या केली. मात्र हर्षवर्धन सपकाळ दोघांची तुलना करून दोघांना सारखा सन्मान द्या, असे म्हणतात. यापेक्षा जास्त लांगुनचालन या जन्मात मी पाहिलेलं नाही, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

