बुलढाणा : अमेरिका सोबतच्या करारामुळे स्थानिक उद्योग व शेतकऱ्यांवरील संकट, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी, शेतमालाला हमीभाव, वाढती महागाई आणि बेरोजगारी, गॅस-पेट्रोल- डिझेल दरवाढ व टंचाई, ईपस्टिन फाईल, खरात प्रकरण व झिरवाळ प्रकरणातील पारदर्शकतेचा अभाव, सामान्य जनतेवरील अन्याय आणि प्रशासनातील अपयश यांसारख्या मुद्द्यांवर काँग्रेस पक्ष राज्यभर आक्रमक झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आज सोमवार, ४ मे रोजी अन्नदाता संघर्ष पदयात्रा काढण्यात आली. बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील जळगाव जामोद तालुक्यात काढण्यात आलेल्या या पद यात्रेचे नेतृत्व सपकाळ यांनी केले. रणरणत्या उन्हात पदयात्रेत काँग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बहुसंख्येने सहभागी झाले.
मानेगाव तिरंगामय
आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव येथून पद यात्रेला उत्साहात सुरुवात झाली. हाती फलक घेतलेले नेते व कार्यकर्ते, गगनभेदी घोषणा, ध्वनिवर्धक वरील देश भक्तीपर गीते, सर्वत्र फडकणारे काँग्रेसचे तिरंगे यामुळे मानेगावमध्ये तिरंगामय वातावरण निर्माण झाले.
या मागण्यासाठी एल्गार
अमेरिकन ट्रेड डीलमुळे आलेले स्थानिक उद्योग व शेतकऱ्यांवरील संकट दुर करा,सरसकट कर्जमाफी करा, ७/१२ कोरा करा, शेतमालाला हमीभाव कायदा लागू करा, सोयाबीनला आणि हरभऱ्याला ८ हजार रूपये, कापसाला १२ हजार तर तुरीला १० हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्या, पीक कर्जासाठी कोणतीही अट लागू करू नका, कृषी साहित्य जीएसटीमुक्त करा, प्रति हंगाम प्रति एकरी ४० हजार रुपये पीक कर्ज द्या, शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारून बेरोजगारांना नोकरी द्या,स्थानिक पुरावे ग्राह्य धरुन आदिवासी बांधवांना जातीचे दाखले द्या, ढासळलेल्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांवर शिक्षकांची रिक्त पदे भरा या मागण्यासाठी पद यात्रा काढण्यात आली .
फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी
यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सर्वच बाबतीत अपयशी ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जनाची नाही तर किमान मनाची लाज बाळगावी आणि गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा असे ते म्हणाले. त्यांच्या जागी सुसंकृत, भ्रष्टाचारमुक्त नेत्याची गृहमंत्री पदी नियुक्ती करावी असा टोला त्यांनी लगावला. बाल लैंगिक अत्याचारच्या घटना वाढल्या आहे. राज्य शासनाने आमच्या मागण्यांची पूर्तता न केल्यास थेट राजधानी मुंबईला धडक देणार अशी घोषणा त्यांनी केली.
