बुलढाणा : छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावरून राज्यात रान पेटले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. या टीकेला हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. शिवराय आमचा स्वाभिमान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला इतिहास शिकवू नये, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

सपकाळ यांनी फेसबुकवरून प्रतिक्रिया दिली. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. शिवराय आमचा स्वाभिमान आहे. टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत होते. ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे परकीयांशी लढत होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस ज्या संघ भाजपाच्या विचारातून येतात ‘त्या विचारांचे लोक’ इंग्रजाची गुलामी आणि हेरगिरी करत होते.

त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला इतिहास शिकविण्याच्या भानगडीत पडू नये. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप आणि आरएसएसच्या भगतसिंह कोश्यारी सह कुणी-कुणी काय-काय मुक्ताफळे उधळली आणि अवमान केलाय हे महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही, अश्या शब्दात त्यांनी भाष्य केले आहे.

संविधानाच्या मूळ प्रतिवर शिवाजी महाराज व टिपू सुलतान दोघांचेही चित्र आहे, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. सोबत संविधानातील या दोघांची चित्रे त्यांनी जोडली आहे.