बुलढाणा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान तुलना करणाऱ्या विधानावरून राज्यात अनेक ठिकाणी रान पेटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी निषेध केला.

सपकाळ यांच्या विधानाविरोधात राज्यात भाजपाने आज आंदोलन केले. पुणे, नागपूर, संभाजीनगर मध्ये भाजपा रस्त्यावर उतरली हर्षवर्धन सपकाळ हे ‘हैद्राबाद च्या निजामाचे वैचारिक औलाद असल्याचे त्यानी सांगितले. शिवाजी महाराज यांची टिपू सुलतान यांच्याशीच काय जगातील कोणत्याच राजा सोबत तुलना होऊ शकत नाही असे ठणकावून सांगितले.

सपकाळांचा आता सावरकर, कोश्यारी चा दाखला…

दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी आज नव्याने भाजपला आव्हान दिले. त्यांनी भाजपला वंदनीय असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका वक्तव्याचा दाखला देत भाजपला सवाल विचारला आहे.

भाजपला निवडणुकीत टिपू सुलतान चालतात. टिपू सुलतान यांचे छायाचित्र हे महानगर पालिका निवडणुकीत भाजपच्या घोषणापत्रात होते. माझा पुतळा जाळण्याऐवजी, सावरकरांनी ‘ शिवाजी महाराज यायला… कावळा बसायला आणी डांग तुटायला.’ असे वक्तव्य केले होते. त्या अनुषंगाने त्यांचे पुतळे भाजप जाळणार आहे का? महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवाजी महाराजांबाबत इतकं विकृत बोलले. त्यामुळे त्यांचेही पुतळे आपण जाळणार आहात का?, असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला. समाज माध्यम वरून त्यांनी हे सवाल केले आहे.

‘देवेंद्रजी, अमरावतीमध्ये आपल्या भाजपने एमआयएमचे मतदान घेतले. चंद्रपूर येथे एमआयएमच्या मदतीने आपण महापौर बसवला. महाराष्ट्रात २१ ठिकाणी आपण आघाडी करता, युती करता, मदत करता, तुमची युती आता लपून राहिलेली नाही. असे असताना काँग्रेससारख्या धर्म निरपेक्ष पक्षावर टीका करणं उचित नाही. महापुरुषांच्या फोटोवर भाजप जे आक्षेप घेत आहे, हा त्यांचा संविधान संपविण्याचा डाव आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

मुळात तथाकथित वाद जो निर्माण झाला आहे, माझ्या वक्तव्याच्या अनुषंगाने भाजप जी गरळ ओकते आहे. मात्र मला शिवाजी महाराज आपल्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही. हे याठिकाणी विनम्रतेने आणी स्वाभिमानाने सांगू इच्छितो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची शान आहेत. त्यांचा पराक्रम अद्वितीय आहे. त्यांच्या पराक्रमामुळे हिंदवी स्वराज्य निर्माण झाले आणि त्या स्वराज्याची प्रेरणा थेट स्वरूपामध्ये आपल्या संविधानापर्यंत आहे.

काल पत्रकारांनी प्रश्न विचारत असताना विचारले की, महामानवांचे आणि विशेष करून शिवाजी महाराज आणी टिपू सुलतान यांचे छायाचित्र कार्यालयामध्ये लावण्यात याव्यात अशी मागणी होत आहे. याकडे आपण कसे बघता त्याच्या उत्तरादाखल माझं जे उत्तर होतं. ते हे होतं की, शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विचार दिला. त्याचाच आदर्श हा टिपू सुलतान यांनी घेतला. टिपू सुलतान हे शिवरायांचा आदर्श घेऊन इंग्रजाशी ते लढले. त्या अनुषंगाने माझे वक्तव्य आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

मला विचारण्यात आलेल्या प्रश्नाला दाबून कुठेतरी हे वक्तव्य चालविण्यात येत आहे. हा भारतीय जनता पक्षाचा हा खोडसाळपणा आहे, असे सपकाळ यांनी नमूद केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांची तुलना मी औरंगजेबाशी केली. तेव्हा ते म्हणाले मी त्यांना ओळखत नाही. मी त्यांना जल्लाद म्हटले, मी त्यांना क्रूर असण्याच्या अनुषंगाने ‘दरींदा’ म्हटले. त्यावेळेसही त्यांनी मला ओळख दाखविली नाही. काल, मात्र आवेशात येऊन जे काही त्यांनी माझ्याबदल गरळ ओकली. याचा स्पष्ट अर्थ आहे की महाराष्ट्रत जे मूलभूत मुद्दे आहे आणि दिल्ली स्तरावर ज्या फाईलमध्ये बरंच काही लपलेलं आहे. त्यापासून त्यांना इतरत्र लक्ष वेधण्याचे आहे.

प्रत्येक बाबतीत जात आणणे, प्रत्येक बाबतीत धर्म आणणे, भारतीय जनता पक्षाचा हा जुना फंड आहे. माझ्या वक्तव्याचाही त्याच धोरणाप्रमाणे विपर्यास करुन हिंदू-मुस्लिम तेढ वाढवण्यासाठी भाजप या सगळ्याला खतपाणी घालत आहे. भाजप हा माफीवीरांचा पक्ष आहे त्यामुळेच त्यांनी माफीचा आग्रह धरला आहे.

शिवाजी महाराजांचा जो स्वाभिमान आणि आमचा अभिमान आहे तो मी त्यातही अधोरेखित केला होता. टिपू सुलतान यांच्या अनुषंगाने महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीत टिपू सुलतानचे फोटो भाजपने आपल्या घोषणापत्रात वापरले होते, असा आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला .