बुलढाणा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज शनिवारी, बुलढाण्यातील आपल्या निवासस्थानी शहरातील मोजक्या प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी समवेत संवाद साधला. यावेळी विचारण्यात आलेल्या विविध विषयावरील प्रश्नांवर दिलखुलास उत्तर देताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मात्र त्यांनी म्हैसूरचे राजे टिपू सुलतान यांच्यावर केलेले भाष्य वादग्रस्त ठरण्याची चिन्हे असून याचे पडसाद राज्यात उमटणार अशी चिन्हे आहे.
मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांनी आपल्या कार्यालयीन कक्षात लावलेल्या टिपू सुलतानच्या प्रतिमेबद्धल विचारणा केली असता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता. टिपू सुलतान एक शौर्य गाजवणारे योद्धे, भूमिपुत्र होऊन गेले असे सांगून त्यांनी विखारी विषारी विचारणा जवळ केली नाही. त्यामूळे शौर्याचे लक्षण म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघायला पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.
मुंबईतील काँग्रेसच्या बैठकीबद्धल ते म्हणाले, संघटना बांधणी आणि पुढील वर्षात वाटचाल, याविषयी चर्चा साठी काँग्रेसची १७ आणि १८ फेब्रुवारी ला बैठक आहे. ऑन राज्यातील जिल्हाध्यक्षसह पदाधिकारी बदलण्यावर ते म्हणाले, या संघटनात्मक बाबी आहेत त्याबद्दल पक्षाच्या बैठकीत चर्चा करू. ज्येष्ठ नेते शरद पवार राज्यसभा निवडणूक लढणार याविषयी सपकाळ म्हणाले, यासंदर्भात जेंव्हा बैठक होईल, तेंव्हा चर्चा होईल. मात्र यासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये संवाद होण्याची गरज आहे. किंबहुना व्यापक चर्चा होणे गरजेचे असून त्यानंतर यावर बोलणे योग्य होईल.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या आव्हानावर ते म्हणाले, त्यांचा बंगला विकत घेण्याची माझी ऐपत नाही. मात्र ‘रेडिरेकनर दरात’ विकत असतील तर जरूर विचार करेन, अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अजित पवार यांचा अपघात संशय, टीकेचा विषय ठरला आहे. त्यात खासदार प्रफुल पटेल यांनी दादांना फोन केला तर माझा काय दोष? असा प्रश्न केला होता. त्यावर सपकाळ म्हणाले, पटेलांचा तो मी नव्हेच म्हणण्याचा जुना स्वभाव आहे, त्यात आश्चर्य ते काय? अजित पवार आणि शरद पवार भूमिपुत्र असताना आता पटेल आणि तटकरे पक्ष चालवणार का हा कळीचा मुद्धा आहे.
भारत अमेरिका करारावर ते म्हणाले, याचा भारताला कोणत्याही प्रकाराचा फायदा होणार नाही. शेतकऱ्याचे नुकसानच होणार आहे. शेतकऱ्यांच्या हातात फाशीचा दोर दिल्याशिवाय मोदी सरकार स्वस्थ बसणार नाही अशी सरकारची वाटचाल दिसते.
नरहरी झिरवाळ यांचे खात्यातील लाचमध्ये अटक प्रकरणावर ते म्हणाले, मंत्रिमंडळ आणि हे सरकार भ्रष्ट आणि भ्रष्ट आहे. मिळाले तेथून पैसे काढण्याचा सपाटा लावला आहे. शासकीय निधीतून, सरकारी कामातून भ्रष्ट्राचार सुरू आहे. हे सरकार निगरगठ्ठ, बहिरे मुके आंधळे झाले आहे. पैसे घेताना पकडले तर त्यांच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.

