तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमाला सुगीचे दिवस; राज्यातील ३६४ महाविद्यालयांच्या एक लाख जागांसाठी दीड लाखांवर अर्ज

तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत तंत्रनिकेतन पदविका प्रवेशाची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून यंदा १ लाख ५५ हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमाला सुगीचे दिवस; राज्यातील ३६४ महाविद्यालयांच्या एक लाख जागांसाठी दीड लाखांवर अर्ज
प्रतिनिधिक छायाचित्र

नागपूर : तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत तंत्रनिकेतन पदविका प्रवेशाची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून यंदा १ लाख ५५ हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अनेक वर्षांपासून रिक्त जागांचे संकट असणाऱ्या तंत्रनिकेतन पदवी प्रवेशाला यंदा विद्यार्थ्यांनी पसंती दिली असून राज्यातील ३६४ तंत्रनिकेतन महाविद्यालयांच्या १ लाख १ हजार २२४ जागांसाठी दीड लाखांवर अर्ज आल्याने प्रवेशासाठी झुंबड उडणार आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी समाप्त झाल्यावर तंत्रनिकेतनच्या प्रवेशाला सुरुवात होणार आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदा दहावीचा निकाल चांगला लागल्याने व विद्यार्थ्यांचा ओढा अभियांत्रिकीच्या पदवीपेक्षा पदविका अभ्यासक्रमाकडे असल्याने तंत्रनिकेतनमधील रिक्त जागांचे ग्रहण सुटणार आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाला सुगीचे दिवस परत येणार असल्याचे चित्र दिसू लागले. तंत्रनिकेतनसाठी २६ ऑगस्टपासून प्रवेशाची पहिली फेरी सुरू होणार आहे. त्यापूर्वी २० ऑगस्टला पहिल्या फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २ जूनपासून प्रक्रिया सुरू झाली. नोंदणीची अंतिम मुदत गुरुवार ११ ऑगस्टपर्यंत होती. त्यानुसार राज्यातील १ लाख १ हजार २२४ जागांसाठी दीड लाखांवर अर्ज आले आहेत.

दहावीनंतर तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून लवकर नोकरी मिळवण्याचा मार्ग म्हणूनच तंत्रनिकेतनकडे पाहिले जाते. विशेषकरून अभियांत्रिकीतील पायाभूत अभ्यासक्रम म्हणून ओळखले जाणारे यांत्रिकी आणि स्थापत्य या अभ्यासक्रमांना नेहमीच मागणी राहिली आहे.

या पार्श्वभूमीवर गेल्या दशकभरात राज्यात नवी खासगी तंत्रनिकेतने वाढल्याने प्रवेशाला ओहोटी लागली होती. दोन वर्षांपूर्वी केवळ ७१ हजारांवर जागांवरच प्रवेश झाले होते. मात्र, त्यानंतर निकालात झालेली वाढ आणि नोकरीच्या निर्माण झालेल्या संधींमुळे या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे.

कल असण्याचे कारण..

औद्योगिक क्षेत्राच्या गरजेनुसार तंत्रनिकेतन अभ्यासक्रमामध्ये करण्यात येणारे बदल, शिक्षकांचे वेळोवेळी होणारे प्रशिक्षण, शिवाय उद्योग व्यावसायिक संस्था आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित संस्थांशी आवश्यक करार व संवाद यामुळे तंत्रनिकेतन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची अर्जनोंदणी आणि प्रत्यक्ष प्रवेश वाढत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा पदविका अभ्यासक्रमांकडे कल वाढत आहे.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Harvest diploma course applications seats 364 colleges ysh

Next Story
कपडय़ांच्या किमतीत लवकरच वाढ?; कापड उद्योगावर कापूस तुटवडय़ाचे संकट; अतिवृष्टीने नुकसान, किडीचाही प्रादुर्भाव
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी